रेल्वेस्थानकावर तिकीटांचा काळाबाजार कुडाळमधील घटना
By admin | Published: May 25, 2014 12:39 AM2014-05-25T00:39:29+5:302014-05-25T01:12:01+5:30
प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना धरले धारेवर
कुडाळ : कुडाळ रेल्वेस्थानकावर तत्काळ तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे प्रवाशांच्या नजरेस आल्यावर प्रवाशांनी याबाबत तेथील रेल्वे पोलिसांना धारेवर धरले. प्रवाशांबरोबर झालेल्या वादानंतर रेल्वे पोलिसाने यापुढे योग्य काळजी घेण्याचे मान्य केल्यावर संतप्त प्रवासी शांत झाले. सध्या जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. मोठ्या प्रमाणात चाकरमानी रेल्वेने परत जात आहेत. आपला प्रवास गर्दीशिवाय व सुखरूप व्हावा, याकरिता रेल्वेची तत्काळ तिकीट काढण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते. याचप्रकारे कुडाळ रेल्वेस्थानकावरदेखील तत्काळ तिकिटांमधून आपल्याला आरक्षण मिळावे, म्हणून हे चाकरमानी पहाटेच दाखल होतात. परंतु पहाटे आलेल्या चाकरमान्यांचाही हिरमोड होतो. कारण कुडाळच्या ह्या तिकिट घरामध्ये अगोदरच कुणीतरी तिकिटांसाठी रात्रीपासूनच रांगा लावलेल्या असतात. याबाबत अज्ञाताने अर्ज करून स्थानकावर तिकिटांचा काळा बाजार होत असल्याची तक्र ार केली होती. त्यामुळे कणकवली येथून शनिवारी सकाळी एक रेल्वे पोलीस कुडाळ रेल्वेस्थानकावर पाठविण्यात आला होता. प्रवाशांच्या तक्रारी याठिकाणी काहीजण स्वत:साठी नाहीत, तर जादा पैसे घेऊन दुसर्यांची तिकिटे काढून देतात. रात्री एक आणि सकाळी दुसरा माणूस या ठिकाणी रांगेत उभा असतो परंतु ती व्यक्ती रेल्वे प्रवास करणारी नसते. कणकवलीहून आलेल्या रेल्वे पोलिसाने संबंधित सर्वांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. यावेळी रांगेतील काहीजणांनी आमची ओळखपत्रे तुम्ही तपासू शकत नाही, असे सांगितले. तर काहींनी सर्वांची ओळखपत्रे तपासा व ज्यांचा प्रवाशांशी काहीही संबंध नाही, अशांना बाहेर काढा, असे सांगितले. त्यामुळे काहीवेळ बाचाबाची झाली होती. यावेळी वातावरण तंग बनल्याने एकटा रेल्वे पोलीस पुरता हैराण झाला होता. त्याला तिकीट काढण्यासाठी आलेल्या काही प्रवाशांनी धारेवर धरले. कुडाळात रेल्वे पोलीस नाही काही लोकांनी आणखी पोलीस नाहीत का, अशी विचारणा केली असता त्या पोलिसाने, कुडाळात पोलीस नाहीत. मला कणकवलीहून पाठविले आहे, असे सांगितले. त्यामुळे कुडाळसारख्या मध्यवर्ती ठिकाणच्या गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी रेल्वे पोलीस नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आम्ही उद्यापासून या ठिकाणी योग्य ती काळजी घेऊ. तसेच दररोज तिकिटे काढण्यासाठी आलेल्यांना योग्यप्रकारे शहानिशा करून मगच तिकिटे काढण्यासाठी देऊ, असे सांगितले. एकंदरीत पाहता, रेल्वेस्थानकावर दलालांच्या तत्काळ तिकिटांच्या काळाबाजार करण्याच्या उद्योग जोरदार सुरू झाला असून यावर मात्र प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याचे दिसून येते. नियमात तिकिटे काढणार्यांना मात्र याचा फटका बसत आहे. (प्रतिनिधी)