टिळक पंचांगाप्रमाणे आजपासून रत्नागिरीत गणेशोत्सव

By admin | Published: August 18, 2015 12:36 AM2015-08-18T00:36:09+5:302015-08-18T00:40:30+5:30

गणरायाचे विसर्जन २४ आॅगस्टला

Like the Tilak Panchang, Ganesh Festival in Ratnagiri | टिळक पंचांगाप्रमाणे आजपासून रत्नागिरीत गणेशोत्सव

टिळक पंचांगाप्रमाणे आजपासून रत्नागिरीत गणेशोत्सव

Next

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
टिळक पंचांगानुसार मंगळवारपासून रत्नागिरीत गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरीतील हा गणेशोत्सव १३६ वर्षांचा जुना असून, गेल्या सात पिढ्या टिळक पंचांगाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. १८ आॅगस्टला प्रतिष्ठापना होत असलेल्या गणरायाचे विसर्जन यंदा पाच दिवसांऐवजी ८ दिवसांनी म्हणजेच २४ आॅगस्टला होणार आहे.
याबाबत येथील गणेशभक्त उदय केशव पटवर्धन यांनी ‘लोकमत’ला रत्नागिरीत टिळक पंचांगाप्रमाणे होणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती दिली. रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील पटवर्धन परिवारांपैकी आठ कुटुंबांच्या घरी स्वतंत्रपणे घरगुती गणपती व संपुर्ण कुटुंबांचा मिळून एक गणपती असे टिळक पंचांगानुसार आणले जातात. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. रत्नागिरी शहरातच टिळक पंचांगाप्रमाणे सुमारे २५ गणपतींचे पूजन केले जाते. त्याशिवाय गणेशगुळे, शिरगाव येथील मनोहर जोशी यांच्या घरीही गणेशपूजन केले जाते. गुहागर तालुक्यात व जिल्ह्याच्या अन्य भागातही टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो.
गेली १३६ वर्षे या पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा केला जातो. ‘निर्णयसागर’ किंवा अन्य पंचांगानुसार बहुतांश लोक गणेशोत्सव साजरा करतात. परंतु, टिळक पंचांग मानणारेही जिल्ह्यात बऱ्यापैकी आहेत, असे पटवर्धन यांनी सांगितले.
आदल्या दिवशी गणेशमूर्ती घरी आणली जाते. मंगळवारी गणेशमूर्ती सकाळी १० वाजता प्रतिष्ठापित केली जाते. खरेतर पाच दिवसांचा हा गणेशोत्सव असतो. पण यावेळी गौरी आगमन व विसर्जनाचे दिवस या पंचांगाप्रमाणे पुढचे आल्याने यंदाचा गणेशोत्सव हा आठ दिवसांचा राहणार आहे. गणेशोत्सवात २२ आॅगस्टला खड्याच्या ५ गौरी आणल्या जाणार आहेत. तर २४ आॅगस्टला गौरी व गणपती यांचे विसर्जन होणार आहे.
शहरात मुख्यत्वे पटवर्धन परिवारातील ८ कुटुंबाच्या घरी होणाऱ्या गणेशोत्सवात दर दिवशी सहस्त्रावर्तन, दूधाचा अभिषेक, १२१ मोदकांचा प्रसाद व महापूजा असा कार्यक्रम असतो. मुख्य गणपतीच्या ठिकाणी सहाव्या दिवशी मोठा उत्सव होणार आहे. सहस्त्रावर्तन, टिपऱ्या कार्यक्रम, रात्री महाआरती, त्यानंतर भजन असा कार्यक्रम होतो. यावेळीही हीच परंपरा कायम राखली जाणार आहे.
राज्यातील गणेशोत्सव १७ सप्टेंबरला होत आहे. मात्र, त्यापूर्वी महिनाभर आधी टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव १८ आॅगस्टपासून सुरू होत आहे. रत्नागिरी शहरात या गणेशोत्सवाची धूम आहे. मंगळवारी गणरायाचे आगमन होणार असलेल्या घरी आरास व गणेशाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.


 

Web Title: Like the Tilak Panchang, Ganesh Festival in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.