Sindhudurg: तिलारी धरणाला कालवा फुटीचे ग्रहण, नेमका निधी झिरपतो कुठे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 04:05 PM2024-08-19T16:05:19+5:302024-08-19T16:06:17+5:30
दुरुस्तीवर होतोय कोट्यवधींचा चुराडा
वैभव साळकर
दोडामार्ग : गोव्यासाठी संजीवनी ठरलेल्या तिलारी धरणाच्या कालवा दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधींचा चुराडा केला जात असतानाही कालव्यांना लागलेले फुटीचे ग्रहण, मात्र काही केल्या सुटत नाही. दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा केला जातो, मात्र पुढच्याच वर्षी कुठेना कुठे तरी कालवा फुटतोच. त्यामुळे हा खर्ची घातलेला निधी नेमका झिरपतो तरी कुठे ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शिवाय या कालवा फुटीच्या घटनांना जबाबदार असणाऱ्या ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांवर आतापर्यंतच्या कारकिर्दीत कधीच एकही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. परिणामी या संपूर्ण कारभाराला पाटबंधारे खात्याची संपूर्ण ‘सिस्टम’च जबाबदार आहे का ? आणि नसेल, तर मग या कालवा फुटीच्या एकामागोमाग एक घडणाऱ्या घटनांची चौकशी करण्याचे औदार्य पाटबंधारे खाते दाखविणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला तिलारी धरण प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून कालवा फुटीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सुरुवातीला ४५ कोटींचे अंदाजपत्रक असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास जाईपर्यंत १,६०० कोटींच्या वर जाऊन पोहोचला.
मात्र एवढी कोटींच्या कोटी उड्डाणे घेऊनसुद्धा अद्यापही ज्या भागात हा प्रकल्प साकारलाय त्या दोडामार्ग तालुक्यातील काही गावांत आजही तिलारीचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे या धरणाचा फायदा नेमका कोणाला झाला? हा देखील एक संशोधनाचा विषय बनला आहे. प्रकल्पाने कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली खरी, मात्र अधिकारी आणि ठेकेदारांची त्यामुळे चांदी झाली, असा जो आरोप सर्वसामान्यांकडून आतापर्यंत होत होता तो खरा होता की काय ? असा संशय वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीच्या घटनांमुळे व्यक्त केला जाऊ लागला आहे.
गेल्या चार वर्षांत एकामागोमाग एक घडलेल्या कालवा फुटीच्या घटना हे त्याचेच द्याेतक असल्याचे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. मागील चार वर्षांत खानयाळे, साटेली-भेडशी, आवाडे, घोटगेवाडी, कुडासे, तिलारी अशा विविध ठिकाणी कालवे फुटले आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया तर गेलेच, पण शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसानही झाले. शिवाय ज्याठिकाणी कालवे दुरुस्त केले त्याठिकाणीच बऱ्याचदा कालवा फुटण्याच्या घटना घडल्या. परिणामी केलेला खर्च वाया गेला. मग, या सदोष कामाला जबाबदार कोण?, हा दुरुस्तीच्या नावावर केलेला खर्च नेमका कोणाच्या घशात गेला?, त्या कामांची चौकशी का नाही झाली?, असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत.
आजच्या घडीला कालवा जीर्ण झाला, त्यामुळे तो फुटत असल्याचे सोयीस्कर उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. मग, दुरुस्तीवर जो दरवर्षी खर्च केला जातो, तो नेमका जातो कुठे?, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे
तिलारी धरणावर गब्बर ?
तिलारी धरणामुळे तालुक्याचा विकास होणार या हेतूने तिलारी धरणासाठी धरणग्रस्तांनी जमिनी दिल्या. पण, त्यांची अवस्था सध्या ‘भीक नको पण कुत्रा आवर’, अशी झाली आहे. सुविधांच्या नावाने पुनर्वसन गावठाणात बोंबाबोंब आहे, तर याच धरणाच्या जिवावर परप्रांतीय ठेकेदार गब्बर बनल्याची चर्चा आहे. त्यांच्या कामाची पूर्वी कधी साधी चौकशीही झाली नाही किंवा कदाचित जाणून बुजून केलीही नसेल, त्यामुळेच आज कालवे फुटण्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.
गोव्यातील कालवे टिकाऊ कसे ?
नजीकच्या गोवा राज्यात कालवे फुटल्याची आजमितीपर्यंत एकही घटना ऐकिवात नाही, मग महाराष्ट्राच्या हद्दीतच कालवे का फुटतात ? दोन्हीकडे टेक्निक तीच मग गोव्याचे कालवे टिकाऊ कसे ? हादेखील संशोधनाचा विषय बनला आहे.