Sindhudurg: तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला पाणीपुरवठा करणारे दोन्ही कालवे बंद

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 24, 2025 14:30 IST2025-01-24T14:29:37+5:302025-01-24T14:30:34+5:30

४८ तासातील दुसरी घटना 

Tilari Dam left canal bursts, both canals supplying water to Goa closed | Sindhudurg: तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला पाणीपुरवठा करणारे दोन्ही कालवे बंद

Sindhudurg: तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला पाणीपुरवठा करणारे दोन्ही कालवे बंद

वैभव साळकर

दोडामार्ग : तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याची जलवाहिनी कोसळून ४८ तास पूर्ण होण्याआधीच शुक्रवारी कुडासे भोमवाडी येथे डाव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडले. विशेष म्हणजे कोसळलेल्या जलवाहिनीप्रमाणेच या कालव्याचीही गेल्यावर्षी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे दुरुस्तीच्या नावावर खर्ची घातलेला लाखोंचा निधी पाण्यात गेल्याने तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. शिवाय दोन्ही कालवे फुटल्याने गोव्याचा पाणीपुरवठाही अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.

तिलारी धरणाला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीचे नवनवीन किस्से समोर येऊ लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी दुरुस्तीवर खर्च होऊनही तिलारी धरणाच्या कालव्याना गेल्या काही वर्षात लागलेले फुटीचे ग्रहण काही केल्या सुटत नसल्याचे चित्र सध्या आहे. दोन दिवसांपूर्वीच तिलारीच्या उजव्या कालव्याची गतवर्षी दुरुस्ती केलेली जलवाहिनी कोसळल्याने उजव्या कालव्याचा पाणीपुरवठा बंद झाला होता. या घटनेला ४८ तास उलटले नाहीत. त्याआधीच कुडासे भोमवाडी येथे डाव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडले.

विशेष म्हणजे याच ठिकाणी गतवर्षी कालव्याची दुरुस्ती केली होती. त्याकरिता लाखोंचा निधी खर्ची घातला गेला. पण तरीसुद्धा सहा महिन्याच्या आत कालव्याला पुन्हा भगदाड पडले. त्यामुळे कालव्याचे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतजमिनित घुसल्याने नुकसान झाले. दरम्यान लागोपाठोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे तिलारी प्रकल्पाच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकरी व ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याने असे प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

त्याच - त्याच ठेकेदारांना दिली जाताहेत कामे 

तिलारी धरणाच्या कालव्यांची कामे करणारे ठेकेदार मोजकेच आहेत. त्याच त्या ठेकेदारांना वारंवार दुरुस्तीची कामे देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी केलेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे अनेकदा समोर आले आहे .मात्र तरीसुद्धा त्याच -त्याच ठेकेदारांना कामे देण्याची मेहरबानी अधिकाऱ्यांकडून का ? केली जाते याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे.

अधिकाऱ्यांची चौकशी करा : अंकुश जाधव

तिलारी धरण अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. त्यांचे ठेकेदारांशी असलेल्या साटेलोट्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत असून कालवे फुटत आहेत. त्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांची प्रथम चौकशी व्हावी अशी मागणी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याचे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सांगितले

Web Title: Tilari Dam left canal bursts, both canals supplying water to Goa closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.