तिलारी रामघाटात टेम्पो उलटून व्यावसायिक ठार

By admin | Published: December 25, 2016 11:35 PM2016-12-25T23:35:54+5:302016-12-25T23:35:54+5:30

अन्य दोघेजण किरकोळ जखमी

Tilari rams in tempo, and tempo of professional killed | तिलारी रामघाटात टेम्पो उलटून व्यावसायिक ठार

तिलारी रामघाटात टेम्पो उलटून व्यावसायिक ठार

Next


दोडामार्ग : वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या तिलारी (रामघाट) घाटात बेळगाव ते दोडामार्ग अशी भाजी वाहतूक करणारा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोडामार्ग येथील भाजी व्यावसायिक दुर्गाप्रसाद भिमाप्पा वडर (४५, मूळ रा. कुद्रेमणी, जि. बेळगाव) हा गाडीखाली चिरडून जागीच ठार झाला. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडला.
गेल्या काही वर्षांत रस्त्याच्या डागडुजीकडे झालेले दुर्लक्ष आणि अवजड वाहतुकीचे वाढते प्रमाण आदीमुळे हा रामघाट वाहतुकीस धोकादायकच बनला आहे. असे असले तरी खडी वाहतूक करणारे डंपर, भाजी व्यावसायिक, ब्रॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारे टेम्पो याच घाटातून खाली कोकणात आणि पुढे गोव्यात जाणे पसंत करतात.
रविवारी दोडामार्गचा आठवडा बाजार असल्याने दोडामार्ग बाजारपेठेतील भाजी व्यावसायिक दुर्गाप्रसाद भिमाप्पा वडर हा भाड्याचा टेम्पो (एम एच ०४ - डीएस ३४८) घेऊन बेळगाव येथे गेला होता. शनिवारी मध्यरात्री ते दोडामार्गकडे येण्यास निघाले. यावेळी गाडीत चालक कल्लाप्पा रामकृष्ण पाऊसकर, वैजनाथ गोपाळ तलवार (रा. कुंद्रे्रमणी, बेळगाव) व दुर्गाप्रसाद वडर असे तिघेजण होते. पहाटे हा टेम्पो तिलारी घाटातील मोठ्या उतारावर आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे
भीतीने क्लिनरच्या बाजूला असलेल्या दुर्गाप्रसादने जीव वाचविण्यासाठी बाहेर उडी मारली. याच दरम्यान टेम्पोवरील ताबा सुटल्याने तो उलटला. टेम्पोच्या
खाली दुर्गाप्रसाद चिरडला गेल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती चंदगड पोलिस ठाण्यात समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अधिक तपास चंदगड पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)

रामघाट धोकादायक!
दोडामार्ग आणि नजीकच्या गोवा राज्यात येणारी भाजी प्रामुख्याने बेळगाव (कर्नाटक) येथून आणली जाते. त्यासाठी अत्यंत जवळचा रस्ता म्हणून तिलारी अर्थात रामघाटाचा उपयोग केला जातो. मात्र, नागमोडी वळणे आणि अतितीव्र उतार तसेच अवजड वाहतुकीमुळे झालेली रस्त्याची दुरवस्था आदी कारणांमुळे घाटातील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. असे असले तरी वाहनचालक जीवावर उदार होऊन वाहतूक करण्याचा धोका पत्करतात. मूळात या घाटाला उपप्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओची परवानगी नाही. त्यांच्या मते हा घाट वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने हा घाट आपल्याकडे हस्तांतरित केलेला नाही. परिणामत: सध्या या घाटाची मालकी पाटबंधारे विभागाकडेच आहे. तिलारी प्रकल्पाची यंत्रसामग्री आणण्यासाठी या घाटाची निर्मिती पाटबंधारे विभागाने केल्याने त्यांच्याच ताब्यात तो असून, अधूनमधून त्यांच्याकडूनच घाटाची दुरुस्ती होते.

Web Title: Tilari rams in tempo, and tempo of professional killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.