तीस लाखांची थकबाकी
By Admin | Published: February 8, 2016 09:45 PM2016-02-08T21:45:34+5:302016-02-08T23:50:03+5:30
कृषी संजीवनी योजना : कोकण परिमंडल; वसुलीसाठी शेतकऱ्यांना पत्र
रत्नागिरी : कृषी संजीवनी योजनेंतर्गत कोकण परिमंडलातील एकूण १५८७ शेतकऱ्यांकडे ३० लाख ४७ हजार ७१६ रूपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांच्याकडील वीज देयकांची थकबाकी वसूल करण्यासाठी ‘कृषी संजीवनी योजना २०१४’ राबविण्यात आली होती. या योजनेला गतवर्षी मुदतवाढही देण्यात आली होती. यावर्षीही ३१ मार्च २०१६पर्यंत शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुदतवाढीमुळे योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कृषी ग्राहकांनी ३१ मार्च २०१४च्या मूळ रक्कमेच्या ५० टक्के थकीत रक्कम ३१ मार्च २०१६पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के मूळ थकीत रक्कम महाराष्ट्र शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे ३१ मार्च २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड हे महावितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१४ नंतर वितरीत करण्यात आलेल्या चालू वीज देयकांचा भरणा करणे योजनेत सहभागी होणाऱ्या कृषी ग्राहकांना क्रमप्राप्त आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ वीज थकबाकीदार असून, त्यांच्याकडे २१ लाख ४७ हजार २०४ रुपयांची थकबाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८६ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ९ लाख ५११ रुपयांची थकबाकी आहे. तर कोकण परिमंडलात विलंब शुल्क दंडासह ३ लाख ९५ हजार १५५ रुपये इतकी थकबाकी रक्कम आहे. पैकी रत्नागिरी जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ५३५ रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख २५ हजार ६२० रुपये इतकी विलंब शुल्क दंडासह थकबाकी आहे. शासनाकडून १९ लाख १९ हजार १७ रुपयांचे अनुदान यासाठी उपलब्ध होणार आहे.
‘कृषी संजीवनी योजना २०१४’ ही तात्पुरत्या व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांना लागू राहणार आहे. कृषी ग्राहकांना वीजबिल भरण्यासंबंधी सुलभ हप्ते आवश्यक असल्यास ग्राहकांच्या विनंतीनुसार मार्च २०१६ अखेर सर्व रक्कम वसूल होईल, अशा रितीने समान मासिक हप्ते देण्यात येणार आहेत. संबंधित योजना तात्पुरत्या व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांना लागू राहील. (प्रतिनिधी)
नियमानुसार कार्यवाही : अन्यथा योजनेकरिता कृषी ग्राहक अपात्र
मात्र, या योजनेत भाग न घेणाऱ्या व योजनेंतर्गत ठरविण्यात आलेल्या रकमेचा भरणा केला नाही, तर अशा कृषी ग्राहकांना योजनेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. तसेच नियमाप्रमाणे व्याज व दंडासह पूर्ण रक्कम ग्राहकांच्या खात्यात दाखवली जाणार आहे. तसेच विद्युत कायदा २००३ नुसार थकबाकी वसुलीकरिता नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.
गतवर्षी कृषी संजीवनी योजनेसाठी मुदत दिली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ वीज थकबाकीदार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८६ वीज थकबाकीदार आहेत.
ग्राहकांना लाभ
महावितरणकडून ग्राहकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे या योजनांचा ग्राहकांना लाभ घेता येत आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांची संख्या महावितरणकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.