तिलारी धरणग्रस्त संघर्ष समितीत फूट
By admin | Published: August 28, 2014 08:56 PM2014-08-28T20:56:30+5:302014-08-28T22:24:30+5:30
संजय नाईक : कामात हलगर्जीपणाची टीका
दोडामार्ग : तिलारी धरणग्रस्त बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गवस हे आपल्या कामात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप समितीचे सचिव संजय नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. समीतीतील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पत्रकातून नाईक यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या या समितीतच आता फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोडामार्ग तालुुक्यातील तिलारी धरणबाधित गावातील दाखलाधारकांस घरटी नोकरी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. याची अंमलबजावणी न झाल्यामुळे या भागातील प्रकल्पबाधित बांधवानी एकत्र येत संघर्ष समितीची स्थापना केली.
या समितीच्या अध्यक्षपदी गेल्या काही वर्षांपासून शशिकांत गणपत गवस आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली दोन ते तीन वेळा मोठी आंदोलने करण्यात आली. शासनस्तरावरून या आंदोलनांची दखलही घेण्यात आली. यात महत्त्वाचे म्हणजे गत महिन्यात तिलारी येथे झालेल्या आंदोलनानंतर धरणग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत प्रत्येक दाखलाधारकास पाच लाख रुपये देण्याचे ठरविण्यातही आले. या सर्वाचा अध्यादेश काढण्यासाठी अध्यक्षांनी मुंबई येथे जाणे आवश्यक होते. तरच १९ आॅगस्टपूर्वी हा अध्यादेश मिळण्याची व चतुर्थीपूर्वी रक्कम मिळण्याची आशा होती. मात्र, या सर्व प्रक्रियेत अध्यक्ष शशिकांत गवस हे निष्काळजीपणे वागले, असा आरोप सचिव नाईक यांनी केला आहे. संघटना कुणा एकट्यावर चालत नाही. याचा विचारही त्यांनी करावा, असे नाईक यांनी म्हटले आहे.आपण या भूमिकेपर्यंत पोहोचण्यासाठी धरणग्रस्तांच्या भावना कारणीभूत आहेत. प्रत्येक धरणग्रस्ताला उत्तर देताना तोंडघशी पडल्यासारखे होत आहे. या सर्व प्रकारात समितीच्या अध्यक्षांचा दोष आहे, असा आरोप करून राजीनाम्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)