तिलारी प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा, बहुतांशी धरणे भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:11 PM2019-07-17T12:11:00+5:302019-07-17T12:12:15+5:30
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७३.०७ टक्के भरला असून या प्रकल्पामध्ये सध्या ३२६.८८९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासांत ५१.६० मिलीमीटर पाऊस झाला असून १८५४.४० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून सततच्या पावसाने बहुतांशी धरणे ७० टक्के भरली आहेत.
सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७३.०७ टक्के भरला असून या प्रकल्पामध्ये सध्या ३२६.८८९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासांत ५१.६० मिलीमीटर पाऊस झाला असून १८५४.४० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून सततच्या पावसाने बहुतांशी धरणे ७० टक्के भरली आहेत.
कणकवली तालुक्यातील देवघर धरण ६०.५४ टक्के भरले असून सध्या या धरणातून १८.५८ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तर यंदाच्या वर्षी घळभरणी झालेल्या अरुणा प्रकल्पामध्ये ३१.५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील ११ लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, पावशी, शिरवल, पुळास, हरकुळ, ओझरम आणि लोरे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. तर वेंगुर्ले तालुक्यातील आडेली लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये ९८.६८ टक्के, सावंतवाडी तालुक्यातील सनमटेंब प्रकल्पात ९५.८२ टक्के आणि वैभववाडी तालुक्यातील नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये ९२.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. हरकुळ प्रकल्पातून सध्या १४.०५ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
गेल्या चोवीस तासांत दोडामार्ग तालुक्यात ९५ मिलीमीटर पावसाची नोंद
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ५१.५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. १ जून २०१९ पासून आजपर्यंत एकूण १४८०.२८ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. तालुका निहाय २४ तासांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत.
सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
दोडामार्ग ९५ (१६८०), सावंतवाडी ६८ (१२७०), वेंगुर्ले २०.२ (१५५६.२४), कुडाळ ८० (१४९६), मालवण १८ (१२६०), कणकवली ८४ (१६८४), देवगड ११ (१२१३), वैभववाडी ३६ (१६८३) असा पाऊस झाला आहे.