तिलारीचा पोटकालवा फुटला

By admin | Published: June 14, 2015 12:46 AM2015-06-14T00:46:52+5:302015-06-14T01:50:41+5:30

सदोष बांधकाम : शेतविहीर कोसळली; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Tillari's bundle broke | तिलारीचा पोटकालवा फुटला

तिलारीचा पोटकालवा फुटला

Next

वैभव साळकर / दोडामार्ग
तिलारी प्रकल्पाचा पोटकालवा सदोष बांधकामामुळे शुक्रवारी रात्री फुटला. ही घटना कसई दोडामार्ग केळीचे टेंब येथे घडली. कालव्याचे पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जनार्दन लक्ष्मण कुबल यांची बांधकाम केलेली शेतविहीर कोसळली. त्यामुुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, याबाबत तिलारी प्रकल्पाचे कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांच्याशी संपर्क साधला असता, पोटकालव्याला पाणी सोडल्याची आपणास कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे कालवा विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, त्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी डावा आणि उजवा असे दोन कालवे खोदण्यात आले आहेत. या दोन्ही कालव्यांवर पोटकालवे काढून तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न तिलारी प्रकल्पाच्या कालवा विभागाने केला. मात्र, काही वर्षांत कालव्यां-बरोबरच पोटकालवे फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. कालव्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. मात्र, कालवा विभाग या सर्व प्रकारांमधून काहीही अर्थबोध घेताना दिसत नाही. कारण असाच प्रकार पुन्हा एकदा शुक्रवारी रात्री कसई केळीचे टेंब येथे घडला.
दोडामार्ग शहराला लागूनच तिलारी प्रकल्पाचा डावा कालवा गेला असून, या डाव्या कालव्यावर पोटकालवा काढण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिउंची असल्याने त्याठिकाणी सिमेंटचे अर्धगोलाकार पाईप टाकून कालव्याचे बांधकाम केले आहे. मात्र, सदोष पध्दत आणि नियोजनाचा अभाव राहिल्याने हा कालवा शुक्रवारी रात्री फुटला आणि कालव्यातील पाणी जनार्दन लक्ष्मण कुबल या शेतकऱ्याच्या भातशेतीत घुसले. पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांची शेतविहीर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. कालवा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका मात्र कुबल यांना बसला असून, शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कालवा विभाग अनभिज्ञ?
या संपूर्ण प्रकारापासून कालवा विभाग अनभिज्ञ आहे. पोटकालव्याला पाणी सोडल्याची माहिती आपल्याला नसल्याचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. त्यामुळे कालव्याला पाणी सोडले तरी कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Tillari's bundle broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.