संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली, नितेश राणेंचा इशारा
By सुधीर राणे | Published: May 12, 2023 02:10 PM2023-05-12T14:10:39+5:302023-05-12T14:11:03+5:30
उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा
कणकवली: संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होईल आणि ते पुन्हा तुरुंगामध्ये जातील. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.
कणकवली येथे आज, शुक्रवारी नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत आणि अनिल देसाईंमुळे उद्धव ठाकरे संपले आहेत. अनिल देसाई काल कुठे होते? राऊतांनी आरे गेस्ट हाऊसमध्ये काय झाले हे प्रथम सांगावे ? राऊतांना अक्कलदाढ अजून आलेली नाही. संजय राऊत हे घाबरले आहेत.
कालच्या न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकार अजून भक्कम झाले आहे. संजय राऊत यांचे तुरुंगामध्ये जाण्याचे दिवस पुन्हा येणार आहेत. तुरुंगामध्ये असताना बाथरूमसाठी अन्य कैद्यांबरोबर ते भांडत असत. इतर कैद्यांनी जेलरकडे याची तक्रार केली होती. पत्राचाळ मधल्या मराठी माणसाचा शाप त्यांना लागणार आहे. त्यामुळे आताच त्यांनी बॅग भरून ठेवावी असेही ते म्हणाले.
मग आमदारकीचा राजीनामा का दिला नाही?
नैतिकतेच्या कारणामुळे मी राजीनामा दिला असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे आता नैतिकतेची भाषा करतायत, मला त्यांना विचारायचे आहे की, शिवसेना अधिकृत ही सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.' उबाठा' हे नाव त्यांना तात्पुरत दिले होते. त्यामुळे त्यांना वेगळे नाव आणि चिन्ह निवडावेच लागेल. राजीनामा दिला तेव्हा फेसबुक लाईव्ह केले त्याची उद्धव ठाकरेंना मी आठवण करून देईन, मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा देतो असे त्यावेळी म्हणाला होतात. मग अजून आमदारकीचा राजीनामा का दिलेला नाही? तुमच्यात खरच नैतिकता असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. २०१४ ते २०१९ चा काळ आठवा. उद्धव ठाकरे सख्ख्या भावाची तुम्ही काय अवस्था करून ठेवली आहे ते न्यायालयात जाऊन बघा.
लालूंच्या मुलाला नतमस्तक व्हायला लावायला हवं होतं
नितीशकुमार यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावर राणे म्हणाले, 'काल नितीशकुमार यांच्याबरोबर लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आलेला होता. ज्या लालूंनी संधी मिळेल तिथे बाळासाहेबांचा अपमान केला होता. हिंदुत्वाचा अपमान केला होता. तुमच्यात हिंमत असती तर नितीशकुमार आणि लालूंच्या मुलाला बाळासाहेबांच्या खोलीत घेऊन जायला हवे होते, तिथे नतमस्तक व्हायला लावायला हवं होतं. पण तसे झाले नाही.
जो बाळासाहेबांचा झाला नाही, तो इतरांचा काय होणार?
संजय राऊत हे ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतावर खासदार झाले आहेत, त्याचा त्यांनी पहिला राजीनामा द्यावा. मग बघू त्यांची नैतिकता. जो बाळासाहेबांचा झाला नाही, तो इतरांचा काय होणार? तेव्हा बाळासाहेबांनी खासदारकी दिली नाही म्हणून ६ जून १९९८ ला बाळासाहेबांवर एका साप्ताहिकात लेख लिहिला होता. त्यात त्यांनी काय लिहिले आहे? ते जनतेला माहिती आहे असा हल्लाबोलही नितेश राणेंनी केला.