एसटी बंदमुळे स्थानकांतील दुकानदारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:13 IST2021-04-28T17:11:27+5:302021-04-28T17:13:27+5:30
CoronaVIrus Kankavli Sindhudurg : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रवासीच नसल्याने एसटीची वाहतूक पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बसस्थानकांतील परवानाधारकांना पुन्हा आपापली दुकाने बंद ठेवणे भाग पडले आहे. त्यामुळे या दुकानदारांची होरपळ सुरू झाली आहे.

एसटी बंदमुळे कणकवली बसस्थानक सुने सुने आहे. (छाया : ओंकार ढवण)
कणकवली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रवासीच नसल्याने एसटीची वाहतूक पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बसस्थानकांतील परवानाधारकांना पुन्हा आपापली दुकाने बंद ठेवणे भाग पडले आहे. त्यामुळे या दुकानदारांची होरपळ सुरू झाली आहे.
या दुकानदारांच्या कुटुंबासह नोकरदार वर्गांवर उपासमारीची पाळी आली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी वर्षाचे ३६५ दिवस आणि स्थानकांमध्ये दैनंदिन १४ ते २४ तास राबणाऱ्या या परवानाधारक दुकानदारांचे पहिल्या पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
२१ ऑगस्टपासून एसटीची प्रवासी सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू झाली होती. त्यामुळे काहींनी आपली दुकाने कशी-बशी सुरू केली, तर काहींना ती सुरू करणे परवडणारे नसल्याने बंद ठेवणे भाग पडले. डिसेंबरच्या दरम्यान प्रवासी संख्या हळूहळू वाढू लागल्याने सर्वच दुकानदारांनी आपापली दुकाने सुरू केली.
परवानाधारक दुकानदार थोडेसे आर्थिकदृष्ट्या सावरत असताना, दुसऱ्या लॉकडाऊनमुळे राज्यातील एसटी प्रवासी सेवाच बंद झाली. त्यामुळे स्थानकांतील सर्वच दुकाने बंद झाली आहेत. शासनामार्फत या सर्वांना कोणतेच लाभ मिळत नसल्याने दुकानदारांसह नोकरदार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
परवानाधारकांना मदत करावी : भाई चव्हाण
प्रवासी सेवा बजावत असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांसह काही स्थानकांतील परवानाधारक दुकानदारांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातून काही बरे झाले, पण काही जणांचे निधन झाले. या संसर्गाची झळ त्यांच्या कुटुंबीयांना बसली आहे. त्यांच्या घरातील काही ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाले आहे.
मात्र, शासन स्तरावर याची कोणीच दखल घेत नाही, अशी खंत एसटी कॅन्टीन व स्टॉलधारक परवानाधारक असोसिएशनचे अध्यक्ष राम हरल, उपाध्यक्ष गणपत तथा भाई चव्हाण यांनी व्यक्त केली आहे, तसेच या परवानाधारक दुकानदारांना शासनाने मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.