‘त्यावेळी’ संसदेत सुवर्णकाळ होता
By admin | Published: January 18, 2015 11:22 PM2015-01-18T23:22:34+5:302015-01-19T00:22:40+5:30
सुनीलकुमार लवटे : सावंतवाडीत बॅ. नाथ पै स्मृतिदिन कार्यक्रम
सावंतवाडी : बॅ. नाथ पै यांच्या काळात विरोधी पक्षनेता व सत्ताधारी नेता या दोघांमध्ये वैर नसून मतभेद होते. यामुळे एकमतांनी ठराव मंजूर व्हायचे. असा सुवर्णकाळ संसदेत पहायला मिळायचा. त्या काळाचे शिल्पकार बॅ. नाथ पै होते, असे प्रतिपादन साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी केले. बॅ. नाथ पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. जी. ए. बुवा, प्राध्यापक डॉ. एल. हिंगमिरे, सचिव रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते. यानंतर साहित्यिक सुनीलकुमार लवटे म्हणाले, बॅ. नाथ पै यांच्या स्वप्नामध्ये कोकणचा विकास होता. ते स्वप्न त्यांनी सत्य केले व कोकणचा कॅलिफोर्निया केला. बॅ. नाथ पै कोकणला लाभले, हे कोकणचे सौभाग्य आहे. सन १९५०-६० सालचा कोकण आज त्यांच्या नेतृत्वामुळे समृद्ध कोकण झाला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात जे दारिद्र्य होते, ते दूरही झाले आहे. त्याकाळात नेतेमंडळी शाळेला भेट देतेवेळी भाताची पेज वगैरे घेऊन जात होते. आता मात्र तो काळ बदलला आहे, असेही लवटे म्हणाले.
कोकण हा जागतिक पातळीवर पोहोचावा, यासाठी त्यांनी कोकणातून रेल्वे आणण्यासाठीच प्रयत्न केले. कोकण हा भाग रेल्वेला जोडला पाहिजे, असेही त्यांचे स्वप्न होते. बॅ. पै यांनी संसदेचा एकही दिवस वाया घालविला नाही. नवे लोकप्रतिनिधित्व घडविण्याची त्यांची ताकद होती. यानंतर त्यांची जागा मधु दंडवते यांनी घेतली. दिल्लीची रेल्वे कोकणाला जोडली व आता ती केरळपर्यंत पोहोचली आहे, असे लवटे यांनी सांगितले. बॅ. नाथ पै हे जागतिक स्तरावर नेतृत्व करणारे होते. ते नाथ पै म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश पोरखा झाला आहे. संसदेत बॅ. नाथ पै बोलायचे, तेव्हा पं. जवाहरलाल नेहरूही त्यांचे भाषण ऐकायचे, असे रमेश बोंद्रे म्हणाले. यावेळी बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)
स्वप्न अधुरे..!
शेतकऱ्यांची वकिली १९६७ मध्ये बॅ. नाथ पै यांनी केली. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकमधील कालव्यांचे पाणी शेतामध्ये आणायचे, हे त्यांचे अधुरे स्वप्न होते. कालवे शेतांना जोडल्यास खरोखरच विकास होईल व तेव्हाच बॅ. नाथ पै यांचे स्वप्न पूर्ण होईल व कोकणचा खऱ्या अर्थाने कॅलिफोर्निया होईल, असे यावेळी साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी सांगितले.