दैनंदिन गरजा भागविताना दमछाक
By admin | Published: November 18, 2016 11:52 PM2016-11-18T23:52:07+5:302016-11-18T23:52:07+5:30
पाचशे, हजारच्या नोटा रद्दचा परिणाम : सामान्य जनता मेटाकुटीस, छोट्या उद्योगांवरही संकटाचे वारे
राजन वर्धन ल्ल सावंतवाडी
शासनाने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केलेच्या निर्णयाने सामान्य जनता दिवसेंदिवस मेटाकुटीस येत आहे. खात्यावर रक्कम असूनही हातात नसल्याने दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सामान्य जनता त्रस्त झाली आहे. नोटा रद्द करण्याच्या निर्णयाच्या नवव्या दिवशीही जिल्ह्यातील बहुतांशी एटीएम बंदच होती. पण बँकासमोरील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून जो-तो सुट्या नोटांसाठी हैराण झाला आहे.
शासनामार्फत मंगळवारपासून सहकारी बँकांचा भरणाही नाकारण्यात आल्याने जिल्ह्यातील अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली पाहायला मिळाली. दोन हजाराच्या नोटा जरी बँकेत आल्या असल्या तरी दोन हजार रुपयाचे सुटे पैसे कोणी देत नाही शिवाय हीच खरी नोट कशावरून असा प्रश्न केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून नोटा उपलब्ध करणे गरजेचे आहे. अन्यथा दोन दिवसात ग्रामस्थांच्या संतापाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
८ नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान मोदींनी पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली. त्या मंगळवारी रात्रीपासूनच एटीएम केंद्रासमोर रांगा लागण्यास सुरूवात झाली. ती आजपर्यंत कायम आहे. दरम्यान, पेट्रोल पंपावर या नोटा चालतील असेही सांगण्यात आले. पण पेट्रोल पंपचालकांनी पाचशे हजार रुपयांचे पेट्रोल भरण्याचा फंडा काढला आणि तो ग्राहकांच्या माथीही मारला. नाईलाजास्तव बँकेतील गर्दी आणि बाजारातील मनाई यामुळे पंपावर या नोटा वापरात येऊ लागल्या. पण सर्वसामान्यांना मात्र पाचशे रूपयाचे तेल टाकणे म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी केविलवाणी अवस्था झाली. पण पेट्रोल पंप वाल्यांनी मात्र चांगलेच हात धुवून घेतले आहे.
दरम्यान, दहा दिवसानंतरही मोदींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली पाहवयास मिळत नाही. बँकेतून बदलून मिळणारी रक्कम अगदी नगण्य म्हणजे केवळ दोन हजाराच्या घरात आहे. आणि तीही आता जवळपास बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय अंदाजाने सर्वसामान्यांना आठवड्याला दोन हजार पुरतात हे जरी खरे असले तरी सर्वसामान्यांना केवळ एकच गरज नाही किंबहुना एकच समस्या नाही. रोज वेगळी गरज आणि वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत मध्यमवर्गाची अवस्थाही गंभीर आहे.
छोटेमोठे उद्योग कर्जातून उभारल्यानंतर त्यातून मिळणारा फायदा आणि भविष्यातील उद्योगाची वृद्धी करण्यासाठीचे नियोजन दिवसेंदिवस नोटा रद्दच्या निर्णयाने कोलमडत असल्याचे चित्र आहे. साधा गाडीचा व्यवसाय करणाऱ्या उद्योगांची अवस्था बिकट झाली आहे. एखाद्या वेळेस गाडीची काही तांत्रिक समस्या निर्माण झाली तरीही केवळ सुट्या रकमेसाठी गाडी आहे तिथेच थांबवावी किंबहुना आहे त्याच परिस्थितीत ठेवावी लागत आहे.
एकंदरीत नोटा रद्दच्या निर्णयाने काळे धनवाले जरी धास्तावले असले तरी सर्वसामान्य मात्र मेटाकुटीस आले आहेत. हे गंभीर वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही. परिणामी प्रशासनाने विनानियोजनातून घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता मात्र संताप व्यक्त
करीत आहे.
दोन दिवसात सतरा कोटी जमा
सावंतवाडीतील एका बँकेत दोन दिवसांपूर्वी केवळ दोन दिवसात तब्बल सतरा कोटी रूपये जमा झाले आहेत. याबाबत संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला. पण ही रक्कम कोणाची हे मात्र त्यांनी सांगण्यास नकार दिला . त्यामुळे ही रक्कम नेमकी काळी की, सफेद याबाबत बँकेचे प्रशासनही गोंधळून गेले आहे.
ठेवी ठेवण्यासाठी पाठलाग
दहा दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयानंतर मात्र सर्वच बँकामधील दैनंदिन व्यवहारामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. एरव्ही बँकेमध्ये ठेवी ठेवण्यासाठी ठेवीदारांना आवाहन करावे लागत होते. आता मात्र परिस्थिती उलटी झाली असून ठेवीदारच ठेवी ठेवण्यास बँकेच्या प्रशासनाचा पाठलाग करताना दिसत आहेत.
जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदर विभागाचा नकार
मालवण : किल्ले सिंधुदुर्गवर पर्यटकांचा ओघ वाढत आहे. ८ नोव्हेंबरपासून शासनाने नोटा बंदीचा निर्णय जाहीर केला. ८ नोव्हेंबरपर्यंत २२ हजार ६०० पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. प्रति पर्यटक १० रुपये शासन कराचा विचार करता २ लाख २६ हजाराचा कर होडी संघटनेकडे जमा झाला होता. मात्र बंदर विभागाकडे हा कर भरणा करण्यास गेलेल्या होडी वाहतूक संघटनेकडून ५०० व १००० रुपयाच्या नोटा स्वीकारण्यास बंदर विभागाने नकार दिला आहे. शासनाने सर्व शासकीय कार्यालयात पाचशे, हजाराची नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले असतानाही बंदर विभागाने नोटा स्वीकारण्यास नकार देत आपल्याकडे शासनाचे कोणतेही आदेश नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कर स्वरूपातील लाखो रुपयांची रक्कम भरणा करण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत होडी संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.