बंदुकीची गोळी स्वतःवर झाडून संपवले जीवन, कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूणाने घेतला टोकाचा निर्णय
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 28, 2023 07:12 PM2023-10-28T19:12:11+5:302023-10-28T19:25:07+5:30
बंदुकीच्या चापास नायलॉन दोरी बांधून ती पायाच्या अंगठ्यास अडकवली, अन् जबड्यात गोळी झाडून घेतली
मालवण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर ( ३८, रा. डिकवल बौद्धवाडी) यांनी ठासणीच्या बंदुकीने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. याबाबतची तक्रार त्यांच्या भावाने पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन डिकवलकर हे मुंबई येथे पत्नी व मोठ्या मुलासह वास्तव्यास होते. त्यांचा लहान मुलगा डिकवल येथे मूळ घरी राहत होता. ते मुंबईहून आपल्या लहान मुलाला नेण्यासाठी काही दिवसांपूर्वी डिकवल येथे आले होते.
कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले होते. त्यांच्या मेहुणीने त्यांच्यासाठी व पत्नीसाठी मुंबई येथे काम पाहिले होते. शुक्रवारी रात्री सचिन यांनी मेहुणीला फोन करत कर्जबाजारी झाल्याने मी जिवाचे बरेवाईट करून घेणार असून तुला काही वेळात त्याची माहिती मिळेल, असे सांगितले. यात तत्काळ त्यांच्या मेहुणीने नातेवाइकांना माहिती देत घरी जाण्यास सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव, कट्टा पोलिस दूरक्षेत्राचे प्रकाश मोरे, सिद्धू चिपकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. या घटनेची माहिती सचिन यांच्या भावाने पोलिस ठाण्यात दिली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव करत आहेत.
जबड्याला बंदूक लावून गोळी झाडली
शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान सचिन यांची आई व मुलगा घरात टीव्ही बघत होते तर वहिनी जेवण बनवित असताना सचिन यांनी अंगणात ठासणीच्या बंदुकीच्या चापास नायलॉन दोरी बांधून ती पायाच्या अंगठ्यास अडकवली व बंदूक जबड्यास लावत गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक मोठा आवाज झाल्याने घरातील मंडळींनी बाहेर धाव घेतली असता सचिन हे खाली पडलेले दिसून आले. या प्रकाराची माहिती गावातील लोकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.