खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा, सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी छेडले धरणे आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास..
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 7, 2024 03:22 PM2024-03-07T15:22:36+5:302024-03-07T15:23:23+5:30
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा, सन २०१७ च्या यादीतील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा, थ्रिप्स ...
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा, सन २०१७ च्या यादीतील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा, थ्रिप्स रोगामुळे व कोळे रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (७ मार्च) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. तर मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये ‘नोटा’ हे बटन दाबून मतदानाचा हक्क बजावणार असल्याचा इशारा दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पीक घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. शासनाकडून केवळ कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. निवडणुका आल्या की कर्जमाफीची घोषणा करून गेली १० वर्षे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आता शासनाच्या घोषणांवर विश्वास राहिलेला नाही. कायम फसवणूकच होणार असेल तर जिल्ह्यातील शेतकरी आता कोणीही योग्य नसल्याचा दाखला देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत ‘नोटा’ बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तसा निर्णय झाला असून, यासाठी निवडणूक कालावधीत सर्व शेतकरी आपल्या गावात प्रयत्न करणार आहेत. याची दखल शासनाने घ्यावी व शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची तत्काळ कार्यवाही करावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
यावेळी जिल्हा शेतकरी संघटक श्यामसुंदर राय, प्रकाश वारंग, आग्नेल फर्नांडिस, अर्जुन नाईक, रामकृष्ण चिचकर, सुरेश गावकर, महेश चव्हाण, सुधीर परब, लाडू परब, कृष्णा तुळसकर, अमोल सावंत, संतोष पेडणेकर, संदीप देसाई आदी शेतकरी उपस्थित होते.