राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आदर्शवत निवासी शाळा सुरू करणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी दिली माहिती
By अनंत खं.जाधव | Published: April 8, 2023 05:55 PM2023-04-08T17:55:58+5:302023-04-08T17:56:18+5:30
शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन होणार
सावंतवाडी :राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आता आदर्शवत निवासी शाळा सुरू केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गात आंबोली गेळे येथे ५०० विद्यार्थी शमतेची निवासी शाळा लवकरच उभारण्यात येणार आहे. शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन करण्यात येणार आहे.त्यामुळे शिक्षकांना आता शिक्षणाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार नाहीत, अशी माहिती शालेय व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील २० टक्के, ४० टक्के आणि ६० टक्के टप्पा अनुदान वितरित करताना ज्या शाळा ३१ मार्चपर्यंत काही निकषात बसले नाहीत त्यांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री केसरकर हे काल, शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, बाळा जाधव, खरेदी- विक्री संघाचे उपाध्यक्ष रेडकर, सोनुर्ली सरपंच भगवान हिराप भारती मोरे, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत, आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, महाराष्ट्रात सर्व शिक्षण विभागात ऑनलाईन प्रणाली आणली जाणार आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात जावून कामे करणे आणि शिक्षण विभागाचे दार ठोठावावे लागणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात शाळांना टप्पा अनुदानासाठी ११हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार ज्या शाळा टप्पा अनुदानास पात्र होत्या, त्यांना ३१ मार्चपूर्वी अनुदान वितरित करण्यात आले आहे.
मात्र, काही शाळांना त्रुटींसाठी दुरुस्ती करून येत्या ३० एप्रिलपर्यंत टप्पा अनुदान वितरीत करण्याचा दृष्टिने शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. कुठलीही शाळा टप्पा अनुदानापासून वंचित राहणार नाही, काही त्रुटी असतील त्या दूर केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.