तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात वाढ
By admin | Published: May 30, 2016 10:06 PM2016-05-30T22:06:01+5:302016-05-31T00:36:58+5:30
जिल्हा तंबाखू, कॅन्सरमुक्तीसाठी ‘वसुंधरा’चे विशेष अभियान--जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष
रजनीकांत कदम -- कुडाळ--संपूर्ण जगात तंबाखूने थैमान घातले असतानाच सिंधुदुर्गातही तंबाखू व तंबाखूजन्य
पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून जास्तीत जास्त जनता ही तंबाखूच्या व्यसनाधीन असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही स्थिती बदलण्यासाठी अमेरिका येथील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ व जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. अनिल नेरुरकर हे नि:स्वार्थीपणे केवळ सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू व कॅन्सरमुक्त व्हावा या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यात गेली अनेक वर्षे ‘तंबाखू व्यसन मुक्ती जाणीव व जागृती अभियान’ वसुधंरा विज्ञान केंद्रामार्फत राबवीत असून हेच
अभियान महाराष्ट्रभर राबविण्याचाही त्यांचा मानस आहे.
३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून डॉ. नेरुरकर हे सन २०११ पासून दरवर्षी जिल्ह्यात येऊन तंबाखू व्यसनमुक्ती जाणीव व जागृती अभियान नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात मोफतपणे राबवितात.
जिल्हा तंबाखू मुक्त व कॅन्सर मुक्त व्हावा याकरिता डॉ. नेरुरकर यांच्यावतीने वसुंधरा विज्ञान केंद्रातर्फे जिल्ह्यात तंबाखू व्यसनमुक्ती जाणीव व जागृती अभियान सन २०११ पासून आतापर्यंत अविरतपणे सुरू आहे. या
सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाविषयी माहिती-
सन २०११-१६ पर्यंत घेण्यात आलेल्या २० (तोंड तपासणी) प्राथमिक कर्करोग मोफत तपासणी शिबिरात आतापर्यंत १ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यामध्ये ८३ लोक कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत असल्याचे आढळले.
या उपक्रमांतर्गत वसुंधरा टाटा आॅन बाईकची सुरुवात ३० सप्टेंबर २०१४ रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेजमधून करण्यात आली. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ५ गावांमध्ये तोंडाची तपासणी शिबिरात ५९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली तसेच जन^-जागृती करिता ३००० पेक्षा अधिक लोकांना माहिती देण्यात आली. व कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत असलेल्या रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येते. वसुंधरा विज्ञान केंद्र व मुंबई टाटा हॉस्पिटल च्यावतीने २००१ ते २०१६ पर्यंत साधारणपणे ५५० शाळा व कॉलेजमधील साधारणपणे १ लाख २५ हजार मुलांना तंबाखू व्यसनमुक्ती व कॅन्सरमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. नेरूरकरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अभियानात डॉ. वैशाली पडते, सतीश मदभावे, भरत पालव, नारायण धावडे, महेंद्र दुरेकर, उत्तम कदम, श्रावणी मदभावे, राशी वेंगुर्लेकर, आशा स्वयंसेविका तसेच वसुधंरा विज्ञान केंद्राचे संचालक, पदाधिकारी व कर्मचारी हे ही सहभागी होऊन कार्यरत असतात.
कायदा काय सांगतो
१८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील व्यक्तीस विक्री करणे दंडनीय आहे, बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणेस मनाई, शैक्षणिक संस्थांच्या (शाळा, महाविद्यालय आदीच्या) १०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनास मनाई, तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टनावर सूचना असणे गरजेचे (पहिल्यांदा २ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही. दुसऱ्यांदा/ नंतर ५ वर्षांनंतर कारावास व ५ हजारपर्यंत दंड), तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी. (पहिल्यांदा २ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही. दुसऱ्यांदा/नंतर ५ वर्षांनंतर कारावास आणि ५ हजारपर्यंत दंड.
तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम
तोंडाचा कॅन्सर, मोतीबिंदू, घशाचा कॅन्सर, निकोटिनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य मंदावते, अन्ननलिकेचा कॅन्सर, फुफ्फुस कॅन्सर, श्वासाचा त्रास, यकृताचा कॅन्सर, हृदयविकार, पोटाचा अल्सर, पोटाचा कॅन्सर, नपुंसकत्व, रक्त न पोहोचल्याने हाताची बोटे गळून पडणे, रक्तवाहिन्या संकुलित पावणे, वाढती पाय दुखणी, कार्यक्षमता मंदावणे. तसेच तोंडाला दुर्गंधी, दातांच्या समस्या, दात सडणे, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय आदी सर्व ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो.