सिंधुदुर्गात आज ‘मराठा मोर्चा’

By admin | Published: October 22, 2016 11:39 PM2016-10-22T23:39:33+5:302016-10-23T00:55:46+5:30

गर्दीचा विक्रम मोडणार : मुंबई, कोल्हापूर, गोवा, कारवार येथून मराठा बांधव एकवटणार

Today 'Maratha Morcha' in Sindhudurg | सिंधुदुर्गात आज ‘मराठा मोर्चा’

सिंधुदुर्गात आज ‘मराठा मोर्चा’

Next

सिंधुदुर्गनगरी : ‘एक मराठा, लाख मराठा’ या हाकेला साद देत रविवारी सिंधुदुर्गनगरीत मराठा क्रांती मूक मोर्चासाठी तब्बल चार लाखांहून अधिक मराठा बांधव धडकणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मराठा वादळ पाहावयास मिळणार आहे. . या मोर्चात कोल्हापूर, मुंबई व गोवा, कारवार येथूनही मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चासाठी ७०० पोलिस कर्मचारी व ७० पोलिस अधिकारी असा पोलिस फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे. तसेच सुमारे २५०० स्वयंसेवक मावळे म्हणून त्या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. चौकाचौकांत भगवे ध्वज, भव्य फलक उभारल्याने या मूक मोर्चाकडे साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. शनिवारी मोर्चातील मावळे व रणरागिणी तसेच पोलिस प्रशासनाने रंगीत तालीम घेऊन मोर्चासाठी सज्ज असल्याचे दाखविले. (प्रतिनिधी)


मोर्चाची रूपरेषा
सिंधुदुर्गनगरी येथे सर्व मराठा बांधव रविवारी सकाळी एकत्र जमणार असून, १०.३० वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येईल व त्यानंतर नजीकच्या क्रीडा संकुल मैदानावर जमा होईल. मोर्चाचे सभेत रूपांतर होणार असून, सहा रणरागिणींचे भाषण यावेळी होणार आहे. तत्पूर्वी कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मराठा भगिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. मोर्चाची सांगताही राष्ट्रगीताने होणार आहे.
सिंधुदुर्ग झाला भगवामय
मोर्चाचा माहोल शिगेला पोहोचला आहे. शनिवारी प्रत्येक शहराच्या चौकाचौकांत लहान मुले भगवे ध्वज फडकावत होते. अनेक तरुण दुचाकीस्वार भगवे ध्वज लावून फेऱ्या मारत होते. एकूणच जिल्हा भगवामय झाल्याचे चित्र दिसत होते

२५०० मावळे : तीन एलईडी स्क्रीन; २५ वॉकीटॉकी
सभा स्थळावरील भाषणे पाहता यावीत यासाठी तीन एलईडी स्क्रीन उभारण्यात आले आहेत. अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांतून मोर्चातील छायाचित्रे टिपली जाणार आहेत. लाखो मराठे मोर्चात सहभागी होणार असल्याने मोबाईल नेटवर्क जॅमचा प्रश्न उद्भवू शकतो. म्हणून आयोजकांकडे २५ वॉकीटॉकी राहणार आहेत. २५०० मावळे तत्पर राहणार आहेत. प्रसाधनगृहे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका या दरम्यान तत्पर राहणार आहेत. दिशादर्शक फलकही योग्य त्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत.

Web Title: Today 'Maratha Morcha' in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.