सिंधुदुर्गात आज मराठ्यांची जिद्द दिसणार
By admin | Published: October 23, 2016 12:19 AM2016-10-23T00:19:43+5:302016-10-23T00:33:47+5:30
एक मराठा लाख मराठाचा प्रत्यय येणार : ४ लाख मराठ बांधवांच्या उपस्थितीचा अंदाज
कणकवली : आजपर्यंत मराठा समाज पेटून उठला नव्हता. आता मात्र जिद्दीने एकवटला आहे. मराठ्यांची ही जिद्द रविवारी २३ आॅक्टोबर रोजी सिंधुदुर्गनगरीत दिसणार आहे. या मराठा क्रांती मूक मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे ४ लाख लोक उपस्थित राहणार आहेत, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
ओरोस फाटा येथे हे सर्व मराठा बांधव एकत्र येऊन ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मूक मोर्चाची सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा समाजाला संघटित करू मराठ्यांची फौज तयार केली. शूर मावळ्यांना लढाईचे प्रशिक्षण देऊन मुस्लिम राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले. मुस्लिम जुलूमशाहीविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ही क्रांती रायगड किल्ल्यावर झाली.
मराठा समाजाला शूरविरांची परंपरा आहे. हा मराठा समाज गेली ६0 वर्षे अन्याय सहन करीत आला आहे. पण हा अन्याय किती दिवस सहन करायचा यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे मराठ्यांचा सहनशीलतेचा अंत आता संपलेला आहे. त्यामुळे आता मराठा समाज जिद्द हरणार नाही. ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी मुस्लिम राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातून हाकलून लावले व हिेंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रमाणे आता मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला व तिचा खून करण्यात आला त्या आरोपींना कडक शिक्षा करावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी तातडीने अंमलात आणाव्या, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे व कायद्यात बदल करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे आदी २0 मागण्या करण्यात आल्या आहेत. ज्या ज्या वेळी मराठा समाजावर अन्याय झाला त्या त्या वेळी मराठ्यांचे कुलदैवत नेहमीच मराठ्यांच्या मदतीला धाऊन आले आहे. मुंबईत मराठा समाजावर ज्या वेळी अन्याय झाला त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून मराठा समाजाला जागृत केले. मराठी तरुणांमध्ये लढण्याची ताकद निर्माण केली. तरुणांच्या चेहऱ्यावर तेज आले आणि सर्व तरुण फौज शिवसेनेत दाखल झाली आणि १९९५ साली विधानसभेवर भगवा फडकला. मराठांची ही परंपरा आहे. न्न्यायदेवता नेहमीच मराठ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. (वार्ताहर)