आंगणेवाडीचा आज यात्रोत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार भराडी मातेचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 11:20 AM2023-02-04T11:20:19+5:302023-02-04T12:03:43+5:30
भाविकांचा महापूर उसळणार
मालवण : आंगणेवाडी येथील भराडीमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आंगणेवाडीच्या मार्गावर आहेत. वस्त्रालंकारानी सजलेले देवीचे रुप पाहण्याचे भाग्य यात्रेच्या दिवशी लाभत असल्याने आज, शनिवारी भाविकांचा महापूर आंगणेवाडीत उसळणार आहे.
नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यानी पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी व परिसर गजबजून गेला आहे.
मालवण, कणकवली एसटी आगाराच्या वतीने मोठ्या प्रमाणावर यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरात ३५ ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे यात्रेचे छायाचित्रण करण्यात येणार आहे. कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला. देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी नऊ रांगांमधून व्यवस्था करण्यात आली आहे.
मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी पाणी प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. जत्रोत्सवापूर्वी आंगणेवाडी मध्ये टँकरद्वारे जास्तीचा पाणीपुरवठा नियमित केला जाईल आणि त्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले. बाळा आंगणे यांनी हंगामी एसटी स्टॅन्ड परिसरात रात्रीच्या वेळी खिसे कापू पासून भाविकांना त्रास होतो. त्याबाबत पोलिस प्रशासनाने उपाययोजना करण्याचे मागणी केली.
मागणीनुसार स्टॅन्ड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस विभागामार्फत लावण्याचे सांगण्यात आले. वीज वितरणची लाईन अंडरग्राउंड करण्यात आली आहे. तसेच मोबाइल व्हॅन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात्रा परिसरामध्ये दोन ठिकाणी ५० टॉयलेट आणि एसटी स्टँडच्या ठिकाणी प्रत्येकी १०-१० अशी ७० टॉयलेट यावेळी जत्रा परिसरात असणार आहेत.