नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक
By Admin | Published: June 10, 2014 01:29 AM2014-06-10T01:29:14+5:302014-06-10T01:36:45+5:30
सावंतवाडीत बिनविरोध: वेंगुर्लेतील लढतीकडे लक्ष
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांना कोणतीही मुदतवाढ मिळणार नसून उद्या, मंगळवारी वेंगुर्ला व सावंतवाडी या दोन नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम होणार असून मालवण नगरपरिषदेची नगराध्यक्ष निवड ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होणार आहे. मुदतवाढीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
त्यामुळे सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने बबन साळगांवकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे, तर वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी प्रसन्ना कुबल व मनीष परब या राष्ट्रवादीच्याच दोन नगरसेवकांनी अर्ज सादर केल्याने राष्ट्रवादीचीच सत्ता असलेल्या या पालिकेवर अध्यक्षपदासाठी पक्षाने प्रसन्ना कुबल यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांना विरोध करणाऱ्यांना व्हीप बजावला आहे. अशा परिस्थितीत नेमके काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांसह नगराध्यक्षांना विधानसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ मिळणार असल्याची चर्चा होती. या संदर्भात नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता याबाबतच्या कोणत्याही सूचना वा लेखी आदेश आपल्याकडे प्राप्त झाले नसून, या चर्चेसंदर्भात नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधला असता अशाप्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडीच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या असल्याचे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार उद्या सावंतवाडी व वेंगुर्ला या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष निवडी होणार आहेत, तर २०जूनला मालवण नगराध्यक्ष निवड होणार आहे. (प्रतिनिधी)