राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन
By admin | Published: March 17, 2015 11:29 PM2015-03-17T23:29:15+5:302015-03-18T00:05:16+5:30
नारायण राणेंची उपस्थिती : कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य स्टॉलची उभारणी
कुडाळ : कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या सिंधुकृषी औद्योगिक, पशु, पक्षी व मत्स्य व्यवसाय प्रदर्शन मेळावा या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा औपचारिक शुभारंभ मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या संकल्पनेतील भव्य व राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन मेळा या प्रदर्शनाचे कुडाळ नवीन एसटी बसस्थानकाच्या आवारात मैदानावर १७, १८, १९ व २० मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन १८ मार्च रोजी सकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन १७ मार्चपासून सुरू झाले असून, प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर, युवकचे अध्यक्ष दादा साहिल, काँग्रेस तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, रुपेश पावसकर, पावशी सरपंच पप्या तवटे, पंचायत समिती सदस्य आनंद भोगले व प्रकाश कुंटे, प्रफुल्ल वालावलकर, अस्मिता बांदेकर, अनिल खुडपकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात राज्यस्तरावरून कृषी, पशुसंवर्धन तसेच मत्स्य विभागासंदर्भातील स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, प्राणी संगोपन व इतर विषयासंदर्भातही स्टॉल उभारण्यात आले आहेत. कृषी प्रदर्शनाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुदृढ बैल, गाय, म्हैस, रेडा, शेळी, मेंढी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आकर्षक डॉग शोचेही आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)
शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी पर्वणी
या स्टॉलमध्ये कृषीविषयक सुमारे दोनशे स्टॉल असून, यामध्ये बियाणे, खते, जंतूनाशके तसेच ट्रॅक्टर्स, पॉवर टिलर्स, इरिगेशन व सोलर यासह नामांकीत कंपन्यांचे दालन ठेवण्यात आले आहे. तसेच नवनवीन तंत्रज्ञान विषयक चर्चासत्रेही होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बागायतदार व शेतकऱ्यांसाठी हा मेळावा पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान, औपचारिक उद्घाटनानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी संपूर्ण प्रदर्शनातील स्टॉल्सची पाहणी केली.