सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज मतदान
By admin | Published: May 5, 2015 12:47 AM2015-05-05T00:47:44+5:302015-05-05T00:49:02+5:30
आठ मतदान केंद्रे : ९९९ मतदार बजाविणार हक्क
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. ९९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, ४१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. संकल्पसिद्धी की सहकार वैभव पॅनेल यामध्ये कोण सरस ठरणार, हे गुरुवारी (दि. ७) स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी मतदान प्रक्रियेसाठी अधिकारी, कर्मचारी वर्ग यंत्रसामग्री व साहित्यासह आठ तालुक्यांतील आठ ठिकाणी कुडाळहून रवाना झाले. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात आठ मतदान केंद्रे असून, यामध्ये कुडाळ (तहसील कार्यालय), कणकवली (जुनी तहसील इमारत), मालवण (तहसील कार्यालय), वैभववाडी (तहसील कार्यालय), सावंतवाडी (मंडल अधिकारी कार्यालय), दोडामार्ग (तहसील कार्यालय पहिला मजला), देवगड (पुरवठा शाखा कार्यालय), वेंगुर्ले (सीआरव्ही टपाल कक्ष नवीन इमारत) यांचा समावेश आहे.
मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असून, एखाद्याकडे मोबाईल आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. मतदानाविषयी प्रत्येक मतदाराने गुप्तता पाळावी. हे मतदाराचे कर्तव्य असल्याचे रवींंद्र बोंबले यांनी सांगितले.
गुरुवारी निकाल
सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. ७) ओरोस येथे जाहीर होत असून, कोण विजयी होणार याबाबत मतदारांबरोबरच जनतेलाही उत्सुकता आहे.
यंत्रणा तैनात
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदानासाठी ६० कर्मचाऱ्यांची टीम आठ मतदान केंद्रांत तैनात झाली असून, यामध्ये आठ केंद्राध्यक्ष, प्रत्येक केंद्रावर चार मतदान अधिकारी, शिपाई, दोन पोलीस यांची नियुक्ती केली आहे.
९९९ उमेदवारांची विभागणी
एकूण ९९९ मतदार मतदान करणार असून, यामध्ये मालवण १०९, वेंगुर्ले १०३, वैभववाडी ६७, सावंतवाडी २२४, कुडाळ २००, कणकवली १६२, दोडामार्ग ५६, देवगड-७८ उमेदवार आहेत.