‘जीपीआर गॅलॅक्सी’ करणार माजी विद्यार्थी एकत्र
By admin | Published: April 27, 2015 10:04 PM2015-04-27T22:04:19+5:302015-04-28T00:20:02+5:30
शासकीय तंत्रनिकेतन : १९६१ नंतर बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष निमंत्रण
रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजशी ऋणानुबंध कायम ठेवून या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने ‘जीपीआर गॅलॅक्सी’ ग्रुप तयार केला आहे. या विद्यार्थ्यांच्या वेबसाईटचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. आता या वेबसाईटच्या माध्यमातून १९६१ नंतर या कॉलेजमधून बाहेर पडलेल्या सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा मानस या ग्रुपने व्यक्त केला. शासकीय तंत्रनिकेतनमधून बाहेर पडल्यानंतर आपल्या कॉलेजसाठी, येथील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला हवे, या तळमळीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी ‘जीपीआर गॅलॅक्सी’ नावाने बेवसाईट तयार केली आहे. या वेबसाईटचे अनावरण शनिवारी थिबा पॅलेस येथील कॉलेजच्या आवारात झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. आर. केरकल, तर प्रमुख अतिथी माजी प्राचार्य व्ही. एस. टेंबे होते. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राध्यापक व्ही. एस. तलाठी आणि बी. ए. लवलेकर तसेच या कॉलेजचे माजी विद्यार्थी, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष संजू साळवी, विवेक नार्वेकर, रामू पाटील उपस्थित होते.हा कार्यक्रम सर्वांच्या शीरपेचात तुरा खोवणारा आहे, असे प्रा. टेंबे यांनी सांगितले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तयार केलेल्या वेबसाईटचे अनावरण होत आहे, हा दिवस सुवर्णाअक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे, असे उद्गार त्यांनी काढले. लवलेकर, तलाठी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात केरकल यांनी सोशल मीडियाचा उपयोग विधायक कार्याकरिता कसा होऊ शकतो, याची मार्मिक उदाहरणे दिली. माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारातच असे विविध उपक्रम राबवल्यास कॉलेजशी अॅटॅचमेंट वाढेल, असे ते म्हणाले. लक्ष्य समोर ठेवा, आपोआप उद्दिष्टपूर्ती होत जाते, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी त्यांनी काही प्रमुख सूचनाही केल्या.
या बेबसाईटच्या मदतीने विविध भागात असलेले इतरही माजी विद्यार्थी एकत्र आल्यास दरवर्षी गरजू मुलांचा खर्च उचलणे, शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलांना नोकरी उपलब्ध करून देणे, कॉलेजच्या समस्या सोडविणे शक्य होणार आहे. वेबसाईटची माहिती जीपीआर गॅलॅक्सीयन आशुतोष कवळे आणि सीमा केळकर यांनी सूत्रसंचालनातून दिली.
वेबसाईटच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, या ग्रुपचा विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी केले. नितीन कानविंदे यांनी आभार मानले. या क्षेत्रातील अजोड व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला केरकल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांना एकत्र करण्यात गॅलेक्सीने पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)
पंधरा मिनिटांची शब्दांजली...
दोन मिनिटांच्या स्तब्धतेने श्रद्धांजली अर्पण केली जाते. मात्र, जीपीआर गॅलॅक्सीयन्सनी अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपली मैत्रिण रंजना लिमये (श्रेया मुळ्ये) हिला भावनोत्कट पद्धतीने पंधरा मिनिटांची ‘शब्दांजली’ अर्पण केली. आशुतोष कवळे यांच्या निवेदनासोबतच तिच्या विविध फोटोंची क्लिप आणि या अतिशय भावनिक वातावरणात भर घालणारे ‘बहती हवा सा था वो’ हे अभिनेता आमीर खान याच्यावर चित्रीत केलेले गाणे या भारलेल्या वातावरणाने सर्व माजी विद्यार्थ्यांबरोबरच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू उभे केले. यावेळी रंजना लिमये - मुळ्ये यांच्या मुलांना शिक्षणासाठी या ग्रुपतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला.