शौचालय घोटाळा ; चौकशी मंत्रालयातून
By admin | Published: November 8, 2015 11:16 PM2015-11-08T23:16:07+5:302015-11-08T23:36:02+5:30
सावंतांनी दिले पुरावे : दीपक केसरकरांचे आश्वासन
सावंतवाडी : पंचायत समितीत शौचालय वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सदस्य राघोजी सावंत यांनी थेट ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली असून, त्यांनी या प्रकरणाची मंत्रालय पातळीवरून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सावंत यांना दिले आहे. यामध्ये सद्यस्थितीत १ कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचे मत राघोजी सावंत यांनी व्यक्त केले आहे.पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी वेर्लेसह काही ठिकाणी शौचालय वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून, ज्यांना सरकारी पैशातून घर व शौचालये देण्यात आली, त्यांनाच पुन्हा शौचालयाचे वाटप करण्यात आल्याचे राघोजी सावंत यांचे म्हणणे आहे. त्यांनी याबाबत कागदपत्रासह जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे तक्रार केली असून, आता तर थेट ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेही या प्रकरणी तक्रार केली आहे.सावंत यांच्या मते पूर्ण तालुक्यात शौचालय चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले असून सरकारी योजनांचा फायदा त्याच त्या कुटुंबाना देण्यात आला आहे. पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी ही बाब मुद्दामहून घडवून आणली असून, कागदोपत्री जरी पैसे त्या कुटुंबाना दिले असले, तरी त्यांनी प्रत्यक्षात शौचालये बांधली नाहीत. एका वेर्ले गावातच लाखो रूपयांचा हा भ्रष्टाचार असून, अशी अनेक गावे आहेत. त्यामध्ये सरकारी योजनेच्या नाव, अधिकारी व पदाधिकारी यांनी स्वत:चा फायदा केला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून
दिले. (प्रतिनिधी)
मंत्र्यांकडे कागदपत्रे
ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शौचालय घोटाळ प्रकरणाची मंत्रालय पातळीवरून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन राघोजी सावंत यांना दिले असून सावंत यांनी आपल्याकडील कागदपत्रेही ग्रामविकास राज्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहेत.