..अन्यथा ओसरगाव नाक्यावरील टोलवसुली शिवसेना स्टाईलने बंद पाडू; संदेश पारकर, सतिश सावंतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:55 PM2022-05-26T18:55:00+5:302022-05-26T18:55:33+5:30

एम.एच ०७ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना पूर्णपणे टोल माफी देण्यात यावी अशी मागणी

Toll collection at Osargaon Naka should be stopped in Shiv Sena style, Warning of Sandesh Parkar, Satish Sawant | ..अन्यथा ओसरगाव नाक्यावरील टोलवसुली शिवसेना स्टाईलने बंद पाडू; संदेश पारकर, सतिश सावंतांचा इशारा

..अन्यथा ओसरगाव नाक्यावरील टोलवसुली शिवसेना स्टाईलने बंद पाडू; संदेश पारकर, सतिश सावंतांचा इशारा

Next

कणकवली : टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना संपूर्ण टोल माफी मिळत नाही आणि जिल्ह्यातील महामार्गाची निलंबित कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ओसरगाव येथील टोल नाका चालू करू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत यांनी ओसरगाव येथील हायवे टोल कार्यालयावर धडक दिली.

महामार्गाची कामे अपूर्ण असताना हायवे कंपनीने ओसरगाव येथील टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण पर्यटन विकास मामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर व शिवसेना नेते सतिश सावंत यांनी आज एम डी के टोल वेज कंपनीचे व्यवस्थापक अमोल कळसकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांच्यासह ओसरगाव सरपंच प्रमोद कावले तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली शहराचे आरओडब्लूचे काम अद्याप निश्चित झालेले नसुन अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अजुनही प्रलंबित आहे. टोल नाक्याच्या दोन्ही बाजूंनी सिंधुदुर्ग मधील वाहनांना फ्री वे रस्ता ठेवावा अशी मागणी देखील पारकर व सावंत यांनी केली. खारेपाटण ते झाराप हा केवळ ७० ते ८०किलोमीटर चा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तर टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला चार चार तालुके आहेत. येथील लोकांना जिल्हाभरात सातत्याने आपल्या कामासाठी येजा करावी लागते. त्यामुळे एम.एच ०७ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना पूर्णपणे टोल माफी देण्यात यावी अशी मागणी पारकर यांनी यावेळी केली.

ओरोस येथे जिल्ह्यातील महत्वाची शासकीय कार्यालय आहेत. याठिकाणी देवगड, कणकवली, वैभववाडी या तालुक्यातील लोकांना सातत्याने येता करावी लागते त्यामुळे या वाहनधारकांनी रोजच टोल भरायचा का असा प्रश्न करत संदेश पारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण टोल माफी मिळाली पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाहीत अशी भूमिका मांडली.

मगच टोलवसुलीचा निर्णय घ्या

टोल वसुली सुरु होण्यापूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, महसुल अधिकारी, हायवे अधिकारी, टोल वसुली अधिकारी यांची प्रथम टोलवसुली संदर्भात बैठक घ्या, मगच टोलवसुली विषयी निर्णय घेणेत यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. अन्यथा शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संदेश पारकर आणि सतिश सावंत यांनी दिला.

Web Title: Toll collection at Osargaon Naka should be stopped in Shiv Sena style, Warning of Sandesh Parkar, Satish Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.