मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगावात टोल: शिवसेना आक्रमक, टोलनाक्यावरच मारला ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 01:05 PM2022-06-01T13:05:39+5:302022-06-01T13:07:26+5:30
प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाक्यावर आज, १ जून पासून टोल वसुली करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी बुधवारी धडक देत आंदोलनाचा इशारा दिला. मात्र महामार्ग प्राधिकरणने ही मोहीम थांबविल्याने शिवसेनेने टोल वसुली विरोधात आपली भूमिका कायम असून टोल वसुलीला सुरुवात झाल्यास पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक होईल.तसेच टोलवसुली हाणून पाडेल, असा इशारा यावेळी आमदार वैभव नाईक, कोकण पर्यटन समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, रुपेश पावसकर, ऍड. हर्षद गावडे तालुकाप्रमुख शैलेश भोगले, समीर परब, बाळू मेस्त्री, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, सुशांत दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिक बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून ओसरगाव टोलनाका येथे हजर झाले होते. यावेळी पुन्हा एकदा शिवसैनिक आणि आपला इरादा स्पष्ट करताना कोणत्याही स्थितीत टोल वसुली होऊ देणार नाही असा इशारा आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांनी दिला.
टोलवसुलीबाबत संभ्रम
ओसरगावसोबत राजापूर- हातिवलेमधील टोलही आजपासून सुरू होणार आहे. दरम्यान, याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी या टोल नाक्याला विरोध केला होता