मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर आजपासून टोल वसुली?, वाहन चालकांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 01:05 PM2022-12-01T13:05:42+5:302022-12-01T13:06:02+5:30
सिंधुदुर्गवासीयांसाठी टोलमुक्ती हवेतच विरणार
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर टोलवसुली करण्याकरिता ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामध्ये १ डिसेंबर २०२२ पासून टोल वसुली होणार असल्याचे नमूद केले आहे. मात्र, राजकीय पक्षांकडून सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफ करावा,अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर टोल वसुली लगेचच सूरु होणार का? याबाबत वाहन चालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका अलीकडेच मांडली होती. तर त्याला मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला आहे.
ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोलवसुलीसाठी कंत्राट दिलेल्या ठेकेदार कंपनीकडून दिवसाला ७ लाख ५२ हजार ३७८ रुपये टोलवसुली केली जाणार आहे. टोलवसुली प्रत्यक्ष सुरु केल्यापासून तीन महिन्यापर्यंत या ठेकेदार कंपनीचा ठेक्याचा कालावधी असणार आहे. दिवसाला या कंपनीकडून किती टोलवसुली केली जाते? अन्य बाबींची कितपत पुर्तता केली जाते यावरच रिटेंडर किंवा याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा की नाही हे अवलंबून असणार आहे.
टोलवसुलीचे कंत्राट मिळालेल्या गणेश गढीया कन्स्ट्रक्शन कंपनीने क्षेत्रीय कार्यालयाकडे अनामत रक्कम भरल्यानंतर या कंपनीला रितसर कार्यरंभ आदेश देत टोल वसुलीची जाहीर नोटीस प्रसिद्धी केली आहे. या टोलवसुलीचे दर कुठल्या वाहनांना किती असणार आहेत? याबाबत जनतेला माहिती होण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गवासीयांसाठी टोलमुक्ती हवेतच विरणार
त्यानुसार स्थानिक खासगी वाहनांना ३१५ रुपये दर महिना पास असणार आहे. तर एकावेळेसाठी ९० रुपये ते ५८५ रुपये एवढी रक्कम इतर वाहनांना आकारण्यात येणार आहे.त्यामुळेजिल्हयातील राजकीय पक्षांनी सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना १०० टक्के टोलमाफी देण्याची मागणी करत यापूर्वी आंदोलने केली होती. मात्र ,त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. स्थानिक वाहनांना ३१५ रुपयांचा पास दिला जाणार आहे. महामार्गावरुन जाणार्या- येणार्या वाहनचालकांना आता टोलचा भुर्दंड बसणार, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून सिंधुदुर्ग जिल्हा पासिंग असलेल्या वाहनाना टोल मुक्ती देण्याच्या घोषणा हवेतच विरण्याची भीती निर्माण झाली आहे.