बहुजन क्रांतीचा उद्या मोर्चा
By admin | Published: January 6, 2017 11:22 PM2017-01-06T23:22:51+5:302017-01-06T23:22:51+5:30
विविध २0 मागण्या : जिल्ह्यातील ७२ संघटनांचा मोर्चाला पाठिंबा
सिंधुदुर्गनगरी : अॅट्रॉसिटी कायदा कडक करा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या यासह विविध २० मागण्यांसाठी कुणबी, मराठा, ओबीसी, भटक्या जमाती, अनुसूचित जाती, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शिख, लिंगायत, व विविध धर्मीय सर्व बांधवांचा ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बहुजन क्रांती मोर्चा संयोजक समितीचे अॅड. एस. व्ही. कांबळे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्गनगरीत पत्रकारांशी बोलताना दिली.
सिंधुदुर्गातील विविध ७२ संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढला जाणार असून अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.
एकच पर्व, बहुजन सर्व ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यामध्ये साखळी पद्धतीने बहुजन क्रांती मोर्चे निघत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून रविवार ८ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अश्वारुढ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून (ओरोस फाटा) ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सकाळी १० वाजता भव्य क्रांती मोर्चा निघणार आहे. यापूर्वी अहमदनगर, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रायगड, बुलढाणा, पालघर येथे मोर्चे काढण्यात आले होते. (प्रतिनिधी)