Sindhudurg: झटपट नोकरीसाठी पॉलिटेक्निक, विद्यार्थ्यांचा ओढा कॉम्प्युटरकडे
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 6, 2024 07:00 PM2024-07-06T19:00:35+5:302024-07-06T19:01:25+5:30
सिंधुदुर्ग : पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळण्याची संधी असते. नोकरी मिळाली नाही तरी रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना ...
सिंधुदुर्ग : पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळण्याची संधी असते. नोकरी मिळाली नाही तरी रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना असतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी आता पॉलिटेक्निककडे वळत आहेत. जिल्ह्यात एक शासकीय आणि दोन खासगी अशा तीन पॉलिटेक्निक महाविद्यालयात एकुण ७२० जागा आहेत. झटपट नोकरीसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांचा ओढा कॉम्प्युटरकडे आहे. मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ३२० जागा असून अनेक विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास इच्छूक आहेत. ओरोस येथील एमआयटीएम कॉलेजला ९० आणि सावंतवाडी येथील भोसले पॉलिटेक्निकला ३१० जागा आहेत.
यावर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला गती आली आहे. जिल्ह्यातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची सुविधा असलेले शासकीय १ आणि खासगी २ कॉलेज आहेत. शासकीय नोकरीच्या संधी कमी होत असल्याने तसेच शासकीय नोकरीसाठी मोठी स्पर्धा असल्यामुळे शिकल्यानंतर रोजगार मिळावा, यासाठी विद्यार्थी आता पॉलिटेक्निककडे वळले आहेत. विशेष म्हणजे, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी पॉलिटेक्निक केलेले विद्यार्थी विविध कंपन्या तसेच इतरही क्षेत्रात कार्यरत आहेत. झटपट नोकरी मिळावी यासाठी विद्यार्थी कॉम्प्युटरला अधिक पसंती देत आहेत.
७२० जागांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी केले अर्ज
जिल्ह्यात दोन खासगी आणि १ शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आहे. शासकीय कॉलेजमध्ये ३२० जागा आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांचा ओढा शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा असतो.
९ जुलैपर्यंत करता येणार अर्ज
पॉलिटेक्निकसाठी ९ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. शासकीय कॉलेजला विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. विशेष म्हणजे ११ जुलैला तात्पुरती मेरीट लिस्ट लागणार आहे. १२ ते १४ जुलैदरम्यान, अर्ज भरताना त्रुटी राहिल्यास, कागदपत्रांची दुरूस्ती करता येणार आहे. १६ जुलैला अंतिम लिस्ट लागणार आहे.
विद्यार्थ्यांचा ओढा कॉम्प्युटरकडे
पॉलिटेक्निकनंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी असतात. मात्र, कॉम्प्युटरकडे सध्या अधिकाधिक विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यानंतर सिव्हिल तसेच अन्य शाखांना प्राधान्य दिले जाते.
नोकरी, रोजगाराच्या अनेक संधी
पॉलिटेक्निक केल्यानंतर शासकीय व खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निककडे वाढला आहे. अनेकांचा कॉम्प्युटरकडे ओढा आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत. १६ जुलैला अंतिम यादी लागणार आहे. - डॉ. सुरेश पाटील, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, मालवण