तारकर्ली, देवबागमध्ये पर्यटन बंद
By admin | Published: January 7, 2016 12:09 AM2016-01-07T00:09:33+5:302016-01-07T00:39:07+5:30
‘सीआरझेड’खाली कारवाई : मालवणात आज तहसील कार्यालयावर मोर्चा
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या देवबाग, तारकर्ली, वायरी या गावातील बांधकामांवर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या विरोधात या तीनही गावातील पर्यटन व्यावसायिकांनी दि. ६ व ७ जानेवारी रोजी आपले पर्यटन व्यवसाय बंद ठेवत निषेध नोंदवला आहे. या बंदला बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे. गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत हे पर्यटन व्यावसायिक आपली भूमिका शासन दरबारी मांडणार आहेत. काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सहभागी होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
तारकर्ली, देवबाग, वायरी या गावातील बांधकामावर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली कारवाई करण्यात येत आहे. याविरोधात पर्यटन व्यावसायिकांनी बुधवारी बंद पुकारला होता. दरम्यान, तारकर्ली येथील टीटीडीएस या पर्यटन संस्थेने या आंदोलनात आपण सहभागी नसलो तरी आपली कोणतीही विरोधी भूमिका नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे बुधवारी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. मात्र, हॉटेलमध्ये आलेले काही पर्यटक बोटिंगचा आनंद घेत असल्याने हा बंद संमिश्र असल्याची स्थितीही दिसत होती. मात्र, तीनही गावच्या समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष बाबू बिरमोळे यांनी बुधवारचा बंद ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
बाबा मोंडकर : कागदपत्रांची पूर्तता...
तारकर्ली पर्यटन व्यवसायिक संस्था या बंद आंदोलनात सहभागी झाली नाही. शासनाकडून स्थानिकांचे व्यवसाय, बांधकामे नियमित करण्यासाठी सहकार्य मिळत आहे. व्यावसायिकांनी आवश्यक ती कागदपत्रे व अन्य परवाना पूर्तता केल्यास निश्चितच त्याचा फायदा होणार आहे, असे सांगत संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आम्हा व्यावसायिकांच्या अन्य काही मागण्या आहेत, त्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी बंद मध्ये सहभागी नसलो तरी व्यवसायिक प्रशासनाकडे निवेदन देतील, असे सांगितले.
पर्यटन व्यवसायिकांच्या बंदमध्ये काहींनी सहभाग न दर्शविल्याने या व्यावसायिकांमध्ये फूट पडल्याचे चित्र होते. मात्र, बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी या बंदला पाठींबा देत तसेच आपलेही प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी बंदमध्ये सहभाग घेतला. उद्या गुरुवारी पर्यटन व्यवसाय १०० टक्के बंद ठेऊन मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तीन गावात बंद आंदोलन
तीन गावातील पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला. या बंदमुळे तीन्ही महत्वाच्या गावांमध्ये पर्यटन व्यवसाय बंद होता.