ऐतिहासिक वास्तूंना पर्यटनाची जोड
By admin | Published: April 24, 2016 12:44 AM2016-04-24T00:44:53+5:302016-04-24T00:44:53+5:30
सुरेश प्रभू : मालवणात किल्ले सिंधुदुर्ग महोत्सवास प्रारंभ, तीन दिवस विविध कार्यक्रम
मालवण : किल्ले सिंधुदुर्गशी मालवणकरांचे नाते अतूट आहे. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून किल्ल्याची रचना केली. त्यामुळे किल्ले सिंधुदुर्ग गेली ३५० वर्षे अजस्त्र लाटांशी सामना करत मालवण शहराचे संरक्षण करत आहेत. शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वाभिमानी तत्त्वामुळे जगण्याचा आत्मविश्वास उंचावतो. अशा ऐतिहासिक किल्ल्याला नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकार काम करत आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करताना ऐतिहासिक वास्तूंना पर्यटनाची जोड देण्याबाबत केंद्र व राज्यसरकार विचाराधीन आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गच्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, विजू केनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग किल्लयावर येथे शिव शौर्योत्सव या युद्धथराराच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाद दिली. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिग्दर्शक विजय राणे यांचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
महाराजांचे वारसे जतन होणार
मुनगंटीवार म्हणाले, किल्ले सिंधुदुर्गचा ३५० वा वर्धापन दिन हा संकल्पाचा उत्सव आहे. राज्यस्तरावर गड-किल्ल्यांची डागडुजी तसेच सुविधा देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यासह महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांना शासनाच्यावतीने निधी देण्यात येईल. संबंधितानी तसा अहवाल सादर करावा. राज्याला अर्थमंत्री चांद्याचा तर राज्यमंत्री बांद्याचा आहे. त्यामुळे निधीची कमी पडणार नाही. गडकिल्ल्यांची दुरुस्ती केली नाही तर आम्हाला मंत्री पदावर राहायचा अधिकारही नाही.
राज्य शासनाच्या माध्यमातून महाराजांचे वारसे जतन केले जातील, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी केंद्राकडून सिंधुदुर्गसाठी दरवर्षी ९९ कोटी प्राप्त होणार असून किल्ल्यातील पर्यटन सुविधांसाठी एक कोटीचा निधी प्राथमिक स्तरावर देण्याची ग्वाही केसरकर यांनी दिली. विनायक राऊत, वैभव नाईक यांनी उपस्थितांना संबोधित
केले. (प्रतिनिधी)
गड-किल्ले स्फूर्तिदायक : रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील
सुरेश प्रभू म्हणाले, शिवाजी महाराजांचे गड-किल्ले नवीन पिढीला स्फूर्ती देणारे आहेत. येथील प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देतो आहे. किल्ल्यांचे जतन होणे ही महाराजांना शिवप्रेमीकडून मानवंदना ठरेल. महाराजांनी दूरदृष्टी ठेवून शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी किल्ल्यांची रचना केली. जे संकट ३५० वर्षापूर्वी महाराजांना दिसले होते, ते संकट केव्हाही आपल्यावर येवू शकते. त्यामुळे महाराजांच्या गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच त्यांचा इतिहास रक्षण आणि स्मरण होणे आवश्यक आहे. शासनाच्यावतीने ऐतिहासिक वास्तूंना पर्यटनाची जोड दिल्यास रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असेही प्रभू म्हणाले.