Sindhudurg: पर्यटन विकास महामंडळाचे तारकर्ली केंद्र सज्ज, पण..
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 24, 2023 02:59 PM2023-11-24T14:59:04+5:302023-11-24T14:59:52+5:30
स्वच्छता, सुशोभीकरण, आणि दर्जा यावर विशेष लक्ष
मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण येथे होणाऱ्या नौदल दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून वरिष्ठ पातळीवरील अभ्यागतांच्या आदरातिथ्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तारकर्ली केंद्र सज्ज झाले आहे. सर्वच पातळीवर आम्ही सुधारणा केल्या असून स्वच्छता, सुशोभीकरण, आणि दर्जा यावर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे एमटीडीसीचे विभागीय व्यवस्थापक दीपक माने म्हणाले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली केंद्रासमोरील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदल दिन साजरा होणार आहे. यानिमित्ताने भारताचे पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्री, अधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे या कार्यक्रमासाठी याठिकाणी हजर असणार आहेत. एमटीडीसी च्या तारकर्ली केंद्रामध्ये २२ खोल्या आहेत. या सर्व खोल्यांच्या दर्जा वाढविण्यात आला आहे. फलक, हिरवळ, शोभीवंत झाडे आदींच्या साहाय्याने परिसर शोभिवंत करण्यात आला आहे. ठिकठिकाणी मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत.
अन्य जिल्ह्यातून कर्मचारी मागविले
नौदल दिनामुळे तारकर्ली एमटीडीसी केंद्रात मोठ्या प्रमाणावर अभ्यागत येणार आहेत. याठिकाणी असलेल्या सर्वच्या सर्व खोल्या २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत कार्यक्रमासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची तितकीच आवश्यकता भासणार आहे. यासाठी एमटीडीसीच्या शेजारील जिल्ह्यांमधील उत्कृष्ट कूक आणि कर्मचारी मागविण्यात आले असल्याचे माने म्हणाले.