कणकवलीत ५ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव!, रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची महापर्वणी
By सुधीर राणे | Published: November 25, 2022 03:57 PM2022-11-25T15:57:42+5:302022-11-25T15:58:26+5:30
गेले दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता.
कणकवली: कणकवलीकरांसाठी ५ ते ८ जानेवारी रोजी चार दिवस 'कणकवली पर्यटन महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. रसिकांसाठी महोत्सवात विविध कार्यक्रमांची महापर्वणीच असणार असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. हा महोत्सव आमदार नितेश राणे व मित्र मंडळींच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आज, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, अण्णा कोदे, विराज भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ५ जानेवारीला सायंकाळी भव्य शोभायात्रेने होईल. महोत्सवात लहान व मोठ्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, विविध चित्ररथांसह भव्य शोभायात्रा, फुड फेस्टीवल, १५ वर्षाखालील मुलांचा फॅशन शो, 'आम्ही कणकवलीकर' यांच्यावतीने २०० स्थानिक नामवंत कलाकारांचा संगीत, नृत्य व कॉमेडी कार्यक्रम, मराठी कलाकारांचा 'कॉमेडी एक्सप्रेस' कार्यक्रम असे चार दिवस भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.
पर्यटन महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे. ८ जानेवारीला या महोत्सवाचा समारोप समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे, आजी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. त्यानंतर हिंदी कलाकारांचा व सेलिब्रेटींच्या उपस्थितीत लाईव्ह ऑर्केस्ट्रा होणार आहे.