पर्यटन माहिती केंद्राचा तिढा कायम
By admin | Published: January 14, 2015 10:00 PM2015-01-14T22:00:21+5:302015-01-14T23:52:23+5:30
मालवण येथील प्रकल्प : मच्छिमार महिलांचा कडाडून विरोध
मालवण : मालवण दांडी आवार येथे खारलॅण्ड विभागाच्या सहा इमारतींमध्ये उभारण्यात येणाऱ्या युएनडीपीच्या पर्यटन माहिती केंद्राचा तिढा अद्याप सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या इमारती स्थानिक मच्छिमार महिलांच्या वापरात असून कांदळवन विभागाच्या मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीत या महिलांनी पर्यटन माहिती केंद्राला कडाडून विरोध केला. युएनडीपीच्या पर्यटन माहिती केंद्रामुळे आम्ही विस्थापित होऊ, अशी भीती व्यक्त करीत मच्छिमार महिलांनी बैठक अर्धवट सोडून निघून जाणे पसंत केले.संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सागरी जैवविविधतेचे रक्षण, संवर्धन व त्यातून शाश्वत रोजगार निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत दांडी आवार येथे खारलॅण्ड विभागाच्या अखत्यारितील सहा इमारतींमध्ये पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या इमारती येथील स्थानिक मच्छिमार महिलांच्या वापरात असल्याने या महिलांशी चर्चा करण्यासाठी आज कांदळवन विभागाचे मुख्य वनसंरक्षक व प्रकल्प प्रमुख एन. वासुदेवन यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प समन्वयक पार्थो घोष, युएनडीपीचे आर्थिक व सामाजिक सल्लागार सुहेल जामदार, सागरी संशोधक मार्विन फर्नांडीस, मच्छिमार नेते रमेश धुरी, विकी तोरस्कर, छोटू सावजी, रूपेश प्रभू, मेघनाद धुरी, घारे, रोहित सावंत यांच्यासह मच्छिमार महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
वादग्रस्त इमारतींचे हस्तांतरण नाही
केंद्र सरकारच्या खारलॅण्ड विभागाच्या अखत्यारीत जिल्ह्यात ११ मच्छिमार आवारे आहेत. ही मासळी सुकविण्याची आवारे सध्या मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. यामुळे येथील वादग्रस्त इमारती मत्स्य विभाग परस्पर प्रकल्पकर्त्यांकडे हस्तांतरीत करू शकत नाहीत.
- मेघनाद धुरी
मच्छिमार नेते मालवण
भारतातील एकमेव माहिती केंद्र
दांडी आवार येथे उभारण्यात येणारे माहिती केंद्र हे भारतातील एकमेव दर्जेदार व अद्ययावत माहिती केंद्र ठरणार आहे. २०१६ पर्यंत युएनडीपीच्या प्रकल्पाची मुदत असून यानंतर येथील पर्यटन माहिती केंद्र स्थानिक संस्थेच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
- एन. वासुदेवन
कांदळवन वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक
...तर त्याला आमचा विरोधच राहील
स्थानिकांच्या हिताच्या प्रकल्पांचे सर्व मच्छिमारांच्यावतीने आम्ही स्वागतच करू. मात्र, स्थानिकांना विस्थापित करून कोणताही प्रकल्प राबविला जात असेल तर त्याला आमचा ठाम विरोध राहील. पर्यटन माहिती केंद्राचा अद्ययावत आराखडा स्थानिकांना सादर करण्यात यावा.
- छोटू सावजी
मच्छिमार नेते, मालवण
माहिती केंद्राला महिलांचा विरोध
प्रकल्पप्रमुख एन. वासुदेवन पर्यटन माहिती केंद्राची उपयुक्तता स्पष्ट करीत असताना स्थानिक मच्छिमार महिलांनी पर्यटन माहिती केंद्राला कडाडून विरोध केला. दांडी आवार येथील खारलॅण्ड विभागाच्या अखत्यारीतील सहा इमारती या आमच्या मत्स्य व्यवसायासाठी वापरायच्या असून या इमारतीत युएनडीपीने पर्यटन माहिती केंद्र उभारल्यास आम्ही विस्थापित होऊ, अशी भीती मच्छिमार महिलांनी उपस्थित केली.