चिपळुणातही पर्यटन प्रकल्प उभारणीस वाव
By admin | Published: June 16, 2015 11:19 PM2015-06-16T23:19:10+5:302015-06-17T00:41:23+5:30
आढावा बैठक : पर्यटनाच्या मुद्द्यावर केली चर्चा..
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटन प्रकल्प, व्यावसायिक, पर्यटनप्रेमी, निसर्ग पर्यावरणप्रेमी यांचे संघटन आणि संकलन करणे याबरोबरच पर्यटन प्रकल्प उभारणीस चालना देण्याच्या मुद्द्यांवर पर्यटन विकास आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे ग्लोबल चिपळूण मल्टीपर्पज सोसायटी, लोटिस्मा, अपरांत संशोधन केंद्र, कृषी वसंत शेतकरी विकास संघ यांच्यातर्फे पर्यटन विकास आढावा सहविचार बैठक झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अभियंता सुरेश भोसले होते. यावेळी प्रकाश देशपांडे, श्रीराम रेडीज, संजीव अणेराव, शहनवाज शाह, सुभाष ओतारी, सुशील ओतारी, अविनाश पोंक्षे, मल्हार इंदुलकर, डॉ. रत्नाकर थत्ते, निर्मला चिंगळे आदींसह निसर्ग व पर्यटनप्रेमी उपस्थित होते.
पर्यावरण व पर्यटन उभारणीसाठी शासन, प्रशासन यांच्या सहयोगातून परस्परांना प्रोत्साहन देणे, पर्यटकांसाठी पॅकेज टूर्स आयोजित करणे, पर्यटन केंद्राचा समन्वय राखणे, कार्यशाळा आयोजित करणे, पर्यटकांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेणे, पर्यटक मार्गदर्शकांची एक फळी उभी करणे, पुरातन ऐतिहासिक, पारंपरिक वस्तूंचे संकलन करणे, यावर भर देणे, संग्रहालय उभारणे, अभिनव पर्यटन संकल्पनाचे संशोधनपर अभ्यास करणे, प्रेक्षणीय स्थळांचे संकलन करणे, दस्तऐवजीकरण, माहितीपुस्तिका दृकश्राव्य माहितीपट तयार करुन त्याचे लोकाभिमुखीकरण व प्रसिद्धी करणे आदी विकास मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार प्रत्यक्ष कृतीप्रणव होण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रास्ताविक बापू काणे यांनी केले. समीर कोवळे यांनी आभार मानले. टिळक स्मारक वाचन मंदिरात झालेल्या बैठकीत पर्यटनविषयक विकासावर चर्चा करण्यात आली. चिपळुणला ऐतिहासिक महत्व असून पर्यटन प्रकल्पामध्ये अशा गोष्टींबाबत सविस्तर माहितीचा समावेश करण्यावर भर देण्यात आला. (वार्ताहर)
विविध माध्यमातून प्रयत्न सुरू कोकणात पर्यटन वाढीला चालना देण्याच्या हेतूने अनेक प्रयत्न सुरू असून, त्यातील एक भाग म्हणून जिल्ह्यातील विविध पर्यटन प्रकल्पांची उभारणी कशी करता येईल व त्यातून विकासाचा द्वारे कशी खुली होतील, याचा प्रयत्न सुरू राहिला आहे. चिपळूणमध्ये ग्लोबल चिपळूण मल्टीपर्पज सोसायटी, लोटिस्मा, अपरांत, संशोधन केंद्र, कृषी वसंत शेतकरी विकास संघातर्फे पर्यटन विकास आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपाययोजांवर चर्चा करण्यात आली.