रत्नागिरीतील मत्स्यालय बनतंय प्रेक्षणीय स्थळ
By admin | Published: August 7, 2015 10:31 PM2015-08-07T22:31:16+5:302015-08-07T22:31:16+5:30
पर्यटकांना पर्वणी : सात महिन्यात एक लाख पर्यटकांची भेट
रत्नागिरी : विविध शोभिवंत मासे, सागरीजीव यांच्या आकर्षक मांडणीमुळे मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे मत्स्यालय नव्या स्वरुपात सुरू झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यात महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश येथील पर्यटकांचा ओघ याठिकाणी वाढला आहे. गेल्या सात महिन्यात या मत्स्यालयाला एक लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. रत्नागिरीचा भाट्ये आणि मांडवीचा सागरी किनारा, समुद्राच्या लाटा झेलत ताठपणाने उभा असलेला रत्नदुर्ग, जाज्ज्वल्य देशभक्त लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पदस्पर्श लाभलेले पतितपावन मंदिर, इंग्रज काळातील बंदिवान राजाची स्मृती जागवणारा थिबा पॅलेस ही रत्नागिरीची ओळख आहे. पण यात आता मत्स्यालय या नाविन्यपूर्ण ठिकाणाची भर पडली आहे. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे मत्स्यालय आणि संग्रहालय आता गोड्या पाण्यातील व सागरी जीवनाची सफर घडविणारे हे ठिकाण ‘फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन’ ठरत आहे.
सागरी जीवसृष्टीची ओळख करून देणारे हे संग्रहालय यापूर्वीदेखील कार्यरत होते. परंतु काही कारणास्तव त्याच शहरातील झाडगाव येथील नयनरम्य परिसरात स्थलांतर करण्यात आले आहे. यात गोड्या व खाऱ्या पाण्यातील शोभिवंत मासे व पाणवनस्पती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. गेल्या ५० वर्षांपासून जोपासलेली दोन जातीची समुद्री कासवेही मत्स्यालयाचे आकर्षण ठरत आहेत. तसेच ३५० वेगवेगळ्या जातीचे शास्त्रीय पद्धतीने रसायनामध्ये संग्रहीत मासे विद्यार्थी, संशोधकांसह पर्यटकांना सागरी जीवांची अधिक व्यापक पद्धतीने ओळख करुन देतात. संग्रहालयातील ५५ फूट लांब व ५ टन वजनाचा देवमाशाचा सांगाडा सागरी जीवांच्या भव्यतेची कल्पना पर्यटकांना करुन देतो.
सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्यजीवनाची शास्त्रीय पद्धतीने ओळख करुन देणारे मत्स्यालय आणि संग्रहालय हे विद्यार्थी, संशोधक, शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरत आहे.
मत्स्यालय आणि संग्रहालय नव्या स्वरुपात ११ डिसेंबर २०१४ पासून कार्यरत झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यातच महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या पर्यटकांची संख्या गेल्या सात महिन्यात १ लाखापेक्षा अधिक आहे. निसर्गरम्य सागर किनारा लाभलेल्या रत्नागिरी शहरात सागरातील जीवसृष्टीची माहिती देणारे हे केंद्र स्थलांतरानंतर अधिक प्रेक्षणीय आणि ज्ञानवर्धक ठरले आहे. सागरी जीवसृष्टीची ओळख करून देणारे असल्याने त्याकडे पर्यटनविषयक अभ्यासकेंद्र म्हणून पाहिले जाते. रत्नागिरीतील या ठिकाणाला सात महिन्यात सुमारे १ लाख पर्यटकांनी भेट दिली. (प्रतिनिधी)
पर्यटकांना याठिकाणी सागरी जीवनाबाबत शास्त्रीय माहिती सहज-सोप्या पद्धतीने सांगितली जाते. विविध शोभिवंत मासे, सागरी जीव यांच्या आकर्षक मांडणीमुळे मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढतच राहणार असून, त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- डॉ. हुकुमसिंह ढाकर,
केंद्र्रप्रमुख तथा वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
गोडे पाणी विभागात २८ टाक्यांमध्ये अरोवाना, डिस्कस, कॅट फिश, टेट्रा, प्लॉवर, सिल्व्हर शार्क आणि खारे पाणी विभागात २६ टाक्यांमध्ये मोनोअँजेल, केंड, बटरफ्लाय, लायन, निमो, गोबरा अशा विविध जातीचे मासे पाहायला मिळतात.