सावंतवाडीत पर्यटन स्थळांना झळाळी
By admin | Published: October 5, 2015 10:08 PM2015-10-05T22:08:31+5:302015-10-06T00:29:52+5:30
आवश्यक सोयी पुरविणार : विकास कृती समितीला मदतीचे आश्वासन
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक वास्तूंची पर्यटकांना ओळख व्हावी व शहरातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी सावंतवाडी नगर परिषदेने पर्यटन वेबसाईट तयार केली आहे. शहरातील शिल्पग्राम व मोती तलावात बोटींग सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पर्यटन वाढीसाठी नगर परिषद कटीबद्ध आहे, अशी ग्वाही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.सावंतवाडी पर्यटन विकास कृती समिती व व्यापारी संघाने पर्यटन वाढीसाठी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली. यावेळी जगदीश मांजरेकर, बाळासाहेब बोर्डेकर, आनंद नेवगी, डी. के. सावंत, पुंडलिक दळवी, पुखराज पुरोहित, जितू पंडित, संजय गावडे, दिलीप भालेकर, भारद्वाज पुरोहित, देवेंद्र मोर्ये, गुरूदास देवस्थळी, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
झाराप - पत्रादेवी महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्याने पर्यटकांची वर्दळ शहरात खूप कमी प्रमाणात आढळून येते. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी दोन दिवसांपूर्वी व्यापारी संघाने कृती समिती स्थापन केली. या समितीने नगराध्यक्ष साळगावकर यांची भेट घेऊन पर्यटन वाढीबाबत चर्चा केली. यामध्ये शहरातील बंद प्रकल्प सुरू करणे, ऐतिहासिक पर्यटन स्थळांची माहिती पुस्तिका छापणे, शहरातील पर्यटन स्थळांची माहिती दर्शवणारे मोठे फलक लावणे, तलावातील बोटींग सुविधा सुरू करणे असे विविध प्रकल्प सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पर्यटन वाढीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले की, शहरात सध्या येणारे पर्यटक हे मळगावमार्गे सावंतवाडीत येतात. त्यामुळे शहरातील हॉटेल मँगो नं. २ ते मळगावपर्यंतच्या रस्त्याचे रू ंदीकरण करण्यात येईल. तसेच त्या मार्गावर दिवे (यलो लॅम्प) लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे शिल्पग्राम गेली कित्येक वर्ष सुरू आहे. हा प्रकल्प आता ३० वर्षांच्या करार तत्त्वावर देऊन सुरू करण्यात येणार आहे. मोती तलावातील बोटींग सुविधाही लवकरच सुरू करुन सावंतवाडीचा चेहरामोहरा बदलण्यात येईल जेणेकरून पर्यटक आकर्षित होईल, अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्ष साळगावकर यांनी दिली. (वार्ताहर)
शहरातील पार्कींग अडथळा हा व्यापाऱ्यांच्याच गाड्यांमुळे होतो. आपल्या दुकानासमोर चार-चार गाड्या, ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने लावून ठेवली जातात. यामुळे पर्यटकांना गाड्या पार्कींगसाठी जागा राहत नाही. यामुळे व्यापाऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच लाकडी खेळण्यांची दुकाने रविवारी सुरू ठेवणे आवश्यक असल्याचेही साळगावकर यांनी सांगितले.
सुलभ शौचालय चालविण्यास घ्या
शहरात सुलभ शौचालय चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करा व नगर परिषदेत एकही रूपया भरू नका. शहरात कितीतरी सुलभ शौचालये सुरू आहेत. मात्र, ते स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील कोणीही हे सुलभ शौचालय चालवण्यास घ्यावे व स्वत:चा उदरनिर्वाह करावा. नगर परिषदेत एकही रूपया भरू नका, असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बोलताना
केले.
पर्यटन स्थळांची माहिती पुस्तिका
शहरातील पर्यटन स्थळांचा आढावा घेण्यासाठी कृती समिती व्यापारी व नगर परिषदेने एकत्रित भेट देऊन माहिती घेण्याचा कार्यक्रम करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. तसेच पर्यटनस्थळांची माहिती पुस्तिका छापण्याचे कामही नगर परिषदेने हाती घेतले आहे.
सावंतवाडी पालिकेने केली पर्यटन वेबसाईट तयार.
मोती तलावासह शिल्पग्राममध्येही लवकरच बोटींग सुविधा.
पर्यटन स्थळांची माहिती फलकाव्दारे मिळणार.
मळगावपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार.