पर्यटकांची कार गेली भाजी विक्रेत्याच्या वजन काट्यावरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 06:59 PM2020-10-26T18:59:56+5:302020-10-26T19:02:15+5:30
sawantwadi, tourisam, sindhudurgnews सावंतवाडी शहरात रस्त्याच्या बाजूला बसलेल्या भाजी विक्रेत्याच्या वजन काट्यावरून पर्यटकांच्या कारचे चाक गेल्यामुळे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने संबंधित विक्रेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही. हा प्रकार दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चिटणीस नाका परिसरात घडला.
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात रस्त्याच्या बाजूला बसलेल्या भाजी विक्रेत्याच्या वजन काट्यावरून पर्यटकांच्या कारचे चाक गेल्यामुळे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने संबंधित विक्रेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही. हा प्रकार दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चिटणीस नाका परिसरात घडला.
दरम्यान, संबंधित विक्रेत्याने आपल्याला नुकसान भरपाई द्या,अशी त्यांच्याकडे मागणी केली. यावेळी कार चालकासह कारमधील महिलांनी त्याच्यासमवेत अरेरावी करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी त्या भाजीविक्रेत्याची बाजू मांडली. मात्र, कारमधील संबंधितांनी विक्रेत्यासह जमलेल्या नागरिकांसोबत हुज्जत घालत आपण नुकसान भरपाई देणार नाही. तुम्ही काय करायचे ते करून घ्या,अशी अरेरावी केली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे.
सावंतवाडी शहरात दसरा उत्सवानिमित्त विक्रेते बसले होते. चिटणीस नाका परिसरातही हे विक्रेते बसले होते. संबंधित कार गोव्याकडे जात होती. ती दिल्ली पासिंगची होती. दरम्यान, ते पर्यटक सावंतवाडीत आले असता रस्त्याच्या बाजूस बसलेल्या एका भाजी विक्रेत्याच्या वजन काट्यावरून त्यांच्या कारचे पुढील चाक गेले. यात वजनकाटा तुटल्यामुळे संबंधित विक्रेत्याने आपल्याला नुकसान भरपाई द्या,अशी मागणी केली.
तो वजन काटा जुना असल्याने तुटला. त्यामुळे आम्ही मोठी रक्कम देणार नाही, असे संबंधित कारमधील व्यक्तींनी सांगितले. मात्र, हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संबंधित पर्यटकांनी मास्कचा वापर न केल्याने त्यांच्यावर पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित व्यापाऱ्याला नुकसान भरपाई देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कारमधील महिलांची नागरिकांशी हुज्जत : विक्रेत्याला न्याय देण्याची मागणी
दरम्यान, विक्रेता व संबंधित पर्यटक यांच्यात झालेली शाब्दिक बाचाबाची पाहून नागरिकांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली. यावेळी काहींनी भाजी विक्रेत्यांची बाजू मांडत त्याला नुकसान भरपाई द्या आणि विषय मिटवून टाका, असे सांगितले. मात्र, कारचालकासह कारमधील महिलांनी नागरिकांसोबतसुद्धा हुज्जत घालण्यास सुरुवात केली.दरम्यान, संतप्त नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना देत विक्रेत्याला न्याय देण्याची मागणी केली.