पाऊले चालती तारकर्ली, देवबागची वाट; पर्यटकांची संख्या दरवर्षी गाठतेय नवे उच्चांक

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 29, 2022 03:52 PM2022-10-29T15:52:37+5:302022-10-29T16:00:06+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक नाडी आता मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसायाकडे वळत आहे.

Tourists flock to Sindhudurg district for tourism Tarkarli, Deobagh Full | पाऊले चालती तारकर्ली, देवबागची वाट; पर्यटकांची संख्या दरवर्षी गाठतेय नवे उच्चांक

संग्रहित फोटो

Next

महेश सरनाईक

मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचा हब आहे. येथील नैसर्गिक आणि नयनरम्य सागर किनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारे ठरत आहेत. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. मात्र, आवश्यक सोयी सुविधा देताना स्थानिकांची दमछाक होत आहे. तरीसुद्धा पर्यटकांची संख्या दरवर्षी नवनवीन उच्चांक गाठत आहेत.

मालवणच्या पर्यटन राजधानीत सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणून देवबाग तारकर्लीची निवड होते. सध्या मालवण भरड नाक्यावरून तारकर्ली देवबागकडे जाण्यासाठी केवळ ८ किलोमीटर रस्ता आणि तब्बल २ तास लागत आहेत. चिंचोळा रस्ता, शेकडो गाड्या आणि पर्यटकांची लोंढे घेऊन येणारी मोठी वाहने पाहता तारकर्ली, देवबागमध्ये नेमकं आहे तरी काय की जेथे हजारो लोकं एखाद्या जत्रेला येतात तसे वाटेल त्या वाहनाने येथे पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मागील दोन वर्षे कोरोनाच्या महामारीचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक नाडी आता मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसायाकडे वळत आहे. मालवण, वेंगुर्ला आणि देवगड या तीन तालुक्यांना मिळून १२१ किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवर शेकडो प्रेक्षणिय स्थळे आहेत की जेथे गेल्यावर तेथून परतण्यासाठी मनच वळत नाही.

या तीन तालुक्यातील किनारपट्टीवर काही स्थळे आता पर्यटकांनी गजबजून जात आहेत. कारण त्याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. मात्र, मिठबाव, तांबळडेग, खवणे, मोचेमाड, सागरतिर्थ अशी ठिकाणे आहेत की या ठिकाणी जायला रस्ता देखील नाही. तर काही ठिकाणी तोडका मोडका रस्ता आहे. पण इतर कुठल्याही सुविधा नाहीत. त्यामुळे पर्यटक त्याठिकाणी पोहोचले तरी त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

सध्या दिवाळी सुट्टीचा हंगाम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या संख्येने तारकर्ली, देवबाग किनारपट्टीवर येवून धडकले आहेत. शासकीय कार्यालये सोमवारपासून गुरूवारी पर्यंत बंद होती. त्यातच शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस सुट्टी घेतल्यावर मोठा विकेंड मिळत असल्याने किनारे हाऊसफुल्ल झाले आहेत.

मालवण मधील पर्यटनाचा केंद्रबिंदू तारकर्ली देवबाग किनारपट्टी आहे. एका बाजूला पसरलेला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या कुशीतून वाहत आलेल्या सर्व नद्यांचे पाणी एकत्र येऊन समुद्रात मिळणारी नदी यामुळे एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र अशा दोघांच्या कुशीत ही दोन्ही ठिकाणे वसलेली आहे.

त्यामुळे कोकण आणि मुंबई वगळता महाराष्ट्राच्या इतर भागाला समुद्र किनारपट्टी नाही. म्हणून मग हिवाळी पर्यटनाला सर्वाधिक पसंती कोकणाला मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणून हजारो, लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकण किनारपट्टीवर येत आहेत. आणि एमटीडीसीच्या तारकर्ली सेंटरमुळे तारकर्लीची प्रसिद्धी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असल्याने बिच पर्यटनात तारकर्ली, देवबागला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

सध्या मालवण वरून तारकर्ली देवबाग कडे जाणारा रस्ता जेमतेम दोन छोट्या चारचाकी वाहने जातील एवढाच आहे. त्यातही अनेक ठिकाणी रस्ता फारच अरूंद आहे. त्यात जरी मोठी वाहने एकाच वेळी रस्त्यावर आली तर रस्ता पूर्ण जाम होत आहे. दोन्ही बाजूंनी मग वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे या मार्गावर कुठलेही वाहन घेऊन जाणे सध्या सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अतिशय जटिल बनत चालली आहे. भविष्यात ही समस्या मिटवायची असेल तर देवबाग, तारकर्ली साठी पर्यायी नवीन मार्गाची निर्मिती करावीच लागेल.

Web Title: Tourists flock to Sindhudurg district for tourism Tarkarli, Deobagh Full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.