तेरवण-मेढे पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मांदियाळी

By Admin | Published: December 15, 2014 10:17 PM2014-12-15T22:17:54+5:302014-12-16T00:03:02+5:30

सुविधांची उणीव कायम : सहली, वनभोजनांमुळे परिसर गजबजलेला

Tourists visit to Teeravand-Medhe tourist sites | तेरवण-मेढे पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मांदियाळी

तेरवण-मेढे पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मांदियाळी

googlenewsNext

दोडामार्ग : गोवा आणि महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी मुख्य धरण आणि तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा या दोन्ही पर्यटन स्थळांवर सध्या पर्यटकांबरोबरच शालेय सहली व वनभोजनांची वर्दळ सुरु झाली आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील व गोवा राज्यातून सहली मोठ्या संख्येने दाखल होऊ लागल्या आहे. मात्र तेथे पर्यटन सोयी सुविधांची कमतरता असल्याने पर्यटकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्याकडे तिलारी पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची गरज गाहे.
तिलारी पाटबंधारे प्रकल्पाने काही वर्षांपूर्वी साकारलेला तेरवण- मेढे उन्नेयी बंधारा आता तालुक्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आला आहे. तिलारी प्रकल्पाने साकारलेल्या याच बंधाऱ्यावर देशातील सर्वात छोटा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. चंदगड तालुक्यातील तिलारी प्रकल्पाच्या धामणे धरणातील पाणी तिलारीनगरहून वीजघर येथील जलविद्युत प्रकल्पासाठी आणून तेथे वीजनिर्मिती झाल्यावर हेच पाणी पुन्हा तिलारी नदीत तेरवण- मेढे उन्नेयी बंधाऱ्यातच सोडण्यात येते. आणि याच पाण्यावर या बंधाऱ्यावर कार्यान्वित असलेला सर्वात छोटा जलविद्युतनिर्मिती प्रकल्प चालविला जातो. त्यामुळे या बंधाऱ्याची ओळख आता जलविद्युत प्रकल्पासाठीचा बंधारा अशी झाली आहे.
वीजनिर्मिती कशी केली जाते याचे बंऱ्याचजणांना औत्सुक्य असते. ते पाहण्याची संधी पर्यटकांना तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्यावर प्राप्त होत आहे. शिवाय निसर्गसौंदर्याने नटलेल्या तेरवण- मेढे बंधाऱ्यावर प्रकल्पाकडून सुंदर असा बगीचा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य न्याहाळण्याकरीता तेरवण- मेढे उन्नेयी बंधाऱ्यावर पर्यटकांची रीघ वाढू लागली आहे.
तिलारी नदीच्या खरारी नाल्यावर तेरवण -मेढे येथे बंधारा बांधला आहे. निसर्गसौंदर्य व मानवनिर्मित कलाकुसरीचा एक अनोखा नजराणा या बंधाऱ्याच्या रुपाने पर्यटकांना पहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा पर्यटकांच्या पसंतीस उतरू लागल्याने येथील पर्यटन विकास वृध्दीगंत होत आहे. सहाजीकच तेरवण- मेढे आता पर्यटकांची मांदीयाळी सुरु झाली आहे.
दोडामार्ग तालुक्यात एकापेक्षा एक पर्यटन स्थळे आहेत. तरीही पर्यटन सुविधांच्या कमतरतेमुळे गेल्या दहा वर्षांत तालुक्याचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. (प्रतिनिधी)

पर्यटकांना भासतेय सुविधांची वानवा
तेरवण- मेढे बंधाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकाना सुविधांची वानवा जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहांचा अभाव आणि निवास न्याहरीची कमतरता अशा अनेक महत्वाच्या गोष्टी अद्यापही तेथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे तिलारीच्या पर्यटनांला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तिलारी पाटबंधारे प्रकल्पाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Tourists visit to Teeravand-Medhe tourist sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.