समुद्री वादळाचा पर्यटनाला फटका
By admin | Published: October 12, 2015 12:45 AM2015-10-12T00:45:25+5:302015-10-12T00:55:01+5:30
जोर कायम : मासेमारीवरही परिणाम
मालवण : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील खोल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. तब्बल चार दिवस उलटले तरीही वादळाचा जोर कायम असल्याने रविवारी सागरी पर्यटनाला मोठा फटका बसला.
समुद्र खवळल्याने किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आदी पर्यटन सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मालवणात पर्यटनासाठी आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांची मोठी निराशा झाली होती. दरम्यान, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा व धोक्याचा लाल बावटा ७२ तास उलटले तरी आजही कायम आहे. समुद्री वादळामुळे नौका सुरक्षित बंदरात स्थिरावल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. मालवण बंदरात आश्रयासाठी आलेल्या परराज्यातील ट्रॉलर्सपैकी चार ट्रॉलर्सने परतीचा मार्ग धरल्याचे मच्छिमारांतून बोलले जात होते.
बुधवारी रात्रीपासून समुद्रात घोंगावणारे वादळ तीव्र झाले आहे. वादळसदृश स्थितीमुळे मालवण बंदरात आश्रयासाठी आलेले कर्नाटक, केरळ व तमिळनाडू राज्यांतील १९ हायस्पीड ट्रॉलर्स रविवारी चौथ्या दिवशीही बंदरात स्थिरावले होते, तर त्या राज्यातील किनारपट्टीवरून वादळ वरच्या दिशेने सरकल्याने मालवण बंदरातील काही बोटींनी परतीचा मार्ग धरल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)
किल्ले सिंधुदुर्ग दर्शन व स्कुबा डायव्हिंग बंद
मालवणचा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. पर्यटकांची संख्याही वाढली आहे. रविवारी किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी दोन प्रवासी होड्या सोडण्यात आल्या.
त्यानंतर वादळी हवामान व समुद्र खवळलेला असल्याने किल्ले दर्शन बंद करण्यात आले, तर शनिवारी सायंकाळपासून स्कुबा, स्नॉर्कलिंग सागरी क्रीडाप्रकार बंद होते.
वादळी वाऱ्यांचा जोर पावसासह येत्या २४ तासांत कायम राहणार असल्याचा इशारा आहे.
बंदर विभागाने शुक्रवारी लावलेला समुद्रातील धोक्याचा बावटा रविवारीही कायम ठेवला होता.
यासह समुद्रात ४० ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहतील असा इशाराही देताना मच्छिमारांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
मच्छिमारांच्या जाळीत अपेक्षित मासळी मिळत असताना समुद्री वादळामुळे यावर मोठा परिणाम झाला आहे.