कोकण रेल्वे सुधारणांच्या ‘ट्रॅकवर’

By admin | Published: October 16, 2015 11:14 PM2015-10-16T23:14:30+5:302015-10-16T23:23:24+5:30

सुरेश प्रभू : रत्नागिरी स्थानकात सरकत्या जिन्याचे उद्घाटन

On track of Konkan Railway reforms | कोकण रेल्वे सुधारणांच्या ‘ट्रॅकवर’

कोकण रेल्वे सुधारणांच्या ‘ट्रॅकवर’

Next

रत्नागिरी : गेल्या २५ वर्षांत अडगळीत पडलेली कोकण रेल्वे आता नवनवीन बदल, सुविधांच्या माध्यमातून कात टाकत आहे. स्वप्नवत वाटणारी कोकण रेल्वे २५ वर्षांपूर्वी वास्तवात आली, आता ही वास्तवतासुद्धा अनेक सुधारणांनी काही काळात स्वप्नवत होऊ शकते, इतके चांगले बदल, चांगल्या सुधारणा कोकण रेल्वेमध्ये होऊ घातल्या आहेत. अन्य रेल्वेप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा अधिक सुविधांनी कोकण रेल्वे आपला वेगळा दर्जा सिद्ध करील व कोकण रेल्वेचा आदर्श अन्य रेल्वे घेतील, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण आता कोणीही थांबवू शकणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
रत्नागिरी रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचे शुक्रवारी प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर कोकण रेल्वे विभागीय कार्यालयाजवळील सौरऊर्जा पार्कचे उद्घाटन झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल, माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, आमदार राजन साळवी व उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, शिवसेना रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलिपे, या दोन उद्घाटन कार्यक्रमांप्रमाणेच प्रभू यांनी शुक्रवारी वेरवली व सौंदळ या दोन नवीन रेल्वे स्थानकांचे भूमिपूजनही केले.
कोकण रेल्वेला अन्य रेल्वेप्रमाणेच दर्जा व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, अपेक्षित बदलांनुसार प्रलंबित कामे सुरू करण्यात आली आहेत. एस्कलेटर, सौरऊर्जा प्रकल्प, नवी स्थानके हा त्यातीलच भाग आहे. कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण कसे होणार नाही, हे पटवून देण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांनी केला. हे उत्तर न देता दुपदरीकरण व विद्युतीकरण कसे होईल, याची योजना द्या, असे आदेश आपण दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे दुपदरीकरण व विद्युतीकरणात कोणताही अडथळा येणार नाही, असे प्रभू म्हणाले.
रेल्वे ही देशाची आर्थिक रक्तवाहिनी आहे. त्यामुळे रेल्वेबाबत पंतप्रधान मोदी यांना प्रचंड आस्था आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच वर्षांत रेल्वे क्षेत्रात साडेआठ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. रत्नागिरी स्थानकात सुरू झालेला सरकता जिना हा कोकण रेल्वे मार्गावरील पहिला आहे. तसेच सौर ऊर्जा पार्कही रत्नागिरीतच प्रथम सुरू झाला आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, रत्नागिरी विभागाचे अधिकारी बाळासाहेब निकम यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
भूमिपूजनाचा एककलमी कार्यक्रम
गेल्या काही वर्षांत एखाद्या कामाचे भूमिपूजन झाले की काम संपले. भूमिपूजनाच्या अशा अनेक पाट्या वर्षानुवर्षे पाहायला मिळतात. त्यामुळे जनतेलाही आता त्याची सवय झाली आहे. मात्र केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर जी आश्वासने सरकारने दिली ती पूर्ण केली जात आहेत. कोकण रेल्वेच्या विकासकामांबाबतही भूमिपूजन करून कामे थांबलेली नाहीत, तर ती पूर्ण होत आहेत, असे सांगत त्यांनी अन्य पक्षाच्या नेत्यांना चिमटा काढला.
सौर, पवन ऊर्जेवर रेल्वेचा भर
रत्नागिरीत रेल्वेच्या विभागीय कार्यालयाजवळ उभारलेल्या सौर ऊर्जा पार्कमध्ये ३५० किलोवॅट वीजनिर्मिती होत आहे. ही क्षमता आणखी काही प्रकल्पानंतर वाढेल. संपूर्ण कोकण रेल्वे प्रकल्पच सौर व पवन ऊर्जा निर्मितीतून येत्या काही वर्षांत स्वयंपूर्ण होईल, असे मंत्री प्रभू म्हणाले.

Web Title: On track of Konkan Railway reforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.