पारंपरिक मच्छिमारांचे आंदोलन!
By Admin | Published: September 16, 2016 09:34 PM2016-09-16T21:34:06+5:302016-09-16T23:48:40+5:30
तहसीलदार, मत्स्य विभागाला निवेदन : पर्ससीन मासेमारीवर कारवाई करावी
वेंगुर्ले : शासनाने पर्ससीननेट बोटधारकांना काही नियम ठरवून दिलेले असताना या नियमांचे उल्लंघन करून वेंंगुर्ले तालुक्यात पर्ससीननेट धारकांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांंवर अन्याय होत आहे. याबाबत पर्ससीन मासेमारीवर नियमानुसार कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उभादांडा-मूठ, कुर्लेवाडी भागातील सुमारे १00 पारंपरिक मच्छिमारांनी वेंगुर्ले तहसीलदार व मत्स्य विभागाला निवेदनातून दिला आहे. दरम्यान, दोन दिवस मासेमारी बंद ठेवून पारंपरिक मच्छिमारांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे.
या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही वेंगुर्ले तालुक्यात गेली कित्येक वर्षे पारंपरिक मच्छिमारी हा व्यवसाय करत असून, आम्हाला असंख्य प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आज नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे चालणारी पर्ससीननेट मासेमारी पारंपरिक मच्छिमारांच्या जिवावर बेतत आहे.
शासनाने दिलेल्या नियमांचे ते उल्लंघन करून तालुक्यात पर्ससीननेट मच्छिमार अनधिकृतरित्या बिनधिक्कतपणे मच्छिमारी करीत आहेत. केवळ आपल्या अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली हा व्यवसाय सुरू असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. तालुक्यात १० वाव खोलीच्या आत या पर्ससीननेट नौका राजरोसपणे मासेमारी करीत आहेत. यावर नियंत्रण ठेवणे आपले कर्तव्य असताना आपण याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
पर्ससीननेट मच्छिमार आपली मासळी दलालांऐवजी मासे मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतात. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या माशांना चांगला भाव मिळत नसून आपल्यावर उपासमारीची पाळी आली आहे व आपण केवळ या प्रकारात बघ्याची भूमिका घेत आहात. याप्रकरणी आम्हा पारंपरिक मच्छिमारांना योग्य ती मदत न केल्यास मालवणसारखा प्रसंग वेंगुर्ले तालुक्यातही उद्भवूू शकतो. याबाबत आपल्या अधिकाराखाली योग्य तो निर्णय न घेतल्यास पुढील होणाऱ्या गंभीर परिणामांना आपण जबाबदार राहणार आहात, असे निवेदनात नमूद करून तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी पारंपरिक मच्छिमारांनी निवेदनाद्वारे दिला. (प्रतिनिधी)
मासेमारी बंद ठेवून निषेध
वेंंगुर्ले तालुक्यात पर्ससीननेटधारकांचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांंवर अन्याय होत आहे. या विरोधात संबंधित प्रशासनाने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. दोन दिवस मासेमारी बंद ठेवून पारंपरिक मच्छिमारांनी या प्रकरणाचा निषेधही केला आहे.