वैभववाडी शहरातील वाहतूक कोंडी ठरणार डोकेदुखी
By admin | Published: August 26, 2014 09:27 PM2014-08-26T21:27:51+5:302014-08-26T21:49:23+5:30
व्यापाऱ्यांसह नागरिकांना त्रास ; पोलिसांची भूमिका महत्त्वाची, किमान उत्सवकाळात प्रयत्न करावेत
वैभववाडी : वैभववाडी शहरातील वाहतूक कोंडी ही कित्येक वर्षांची बारमाही समस्या आहे. त्यामध्ये वर्षभरापूर्वी खोदलेल्या गटाराने आणखीनच भर घातली आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात ही समस्या अधिकच गंभीर बनत आहे. गणेशोत्सव काळात खासगी वाहनांची संख्या वाढणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालक, व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे किमान उत्सवकाळात तरी पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून होत आहे.
शहराचे क्षेत्रफळ मर्यादीत असले तरी बाजारपेठेतून जाणारा मार्ग एकच आहे. शिवाय रस्त्यालगत मोठ्या साईडपट्ट्या नसल्याने स्थानिक वाहने रस्त्याच्या बाजूलाच थांबवली जातात. त्यामुळे रस्त्यावरून दोन मोठी वाहने सुटताना प्रचंड अडचण होताना दिसते. या नेहमीच्या कसरतीत सणासुदीच्या काळात बाहेरून येणाऱ्या वाहनांची भर पडते. बाहेरून येणारी वाहने अस्ताव्यस्त थांबवली जातात. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ उडत आहे.
बसस्थानक परिसरात समस्या गंभीर
बसस्थानक ते संभाजी चौक हा संपूर्ण परिसर सततच्या वर्दळीने गजबजलेला दिसतो. याच परिसरात रिक्षांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकामने या भागात एकाबाजूने गटार खोदून ठेवल्याने सर्वच वाहनांचा थांबा अगदी रस्त्यावर आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढविण्यात एक प्रकारची भरच पडली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण बाजारपेठेत एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत असून त्याचा फटका व्यापारी बांधवांना बसत आहे. त्याचप्रमाणे संभाजी चौकातील वाहनांची गर्दी सर्वांनाच डोकेदुखी ठरत असून तेथील गर्दीमुळे अनेकदा अपघात घडतात. त्यामुळे गणशोत्सव काळात संभाजी चौक खुला ठेवण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
शांतता समिती सभेनंतरही दुर्लक्षच
तहसीलदार विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा झाली. सभेत व्यापारी व गणेशोत्सव मंडळांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उद्देशाने बसस्थानक, दत्तमंदिर चौक, संभाजी चौकात पोलीस तैनात ठेवणे अपेक्षित होते. मात्र, अधूनमधून कधीतरी ‘ट्रॅफिक पोलीस’ दिसत आहेत.
वेग आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास
बाजारपेठेतील मुख्य रस्त्याला गतिरोधक नसल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही. विशेषत: कधीतरी बाजारपेठेत फेरफटका मारणारे वाहतूक पोलीसही सुसाट वाहनांकडे कानाडोळा करतात. त्यामुळे गर्दीच्या काळात बाजारपेठेत अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सुसाट वाहन चालकांवर कडक कारवाई होत नसल्याने वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही. त्याशिवाय अस्ताव्यस्त थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. तेव्हा खोळंबलेली वाहने कर्णकर्कश ‘हॉर्न’ वाजवून शांतता भंग करतात. मात्र, त्यांच्यावरही कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गणेशोत्सव काळात मुंबईसह अन्य शहरातून खासगी वाहनाने लोक गावात येतात. परंतु असंख्य वाहनांच्या दर्शनी भागावर पोलीस, प्रेस, महाराष्ट्र शासन, आॅन गव्हर्नमेंट ड्युटी अशा पाट्या दिसतात. इतकेच नव्हे तर लाल व अंबर दिव्यांच्या गाड्याही फिरत असतात. मात्र अशा पाट्या टाकलेल्या किंवा दिव्यांच्या वाहनांची तपासणी करून सत्यता पडताळली जात नसल्यानेच अशा प्रकारची वाहनेच वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत.