..अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वागदेतील 'ती' बंद लेन सुरू, वाहन चालकांमधून समाधान
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 30, 2022 04:58 PM2022-08-30T16:58:06+5:302022-08-30T16:58:32+5:30
गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला तरीही 'लेन' दुरूस्तीचे काम सुरु राहिल्याने वाहनचालकांची गैरसोय होत होती.
सिंधुदुर्ग : वागदे येथे शुक्रवारी (दि.२६) झालेल्या भीषण अपघातानंतर गडनदी पुलानजीकच्या मुंबई-गोवा महामार्गावरील बंद असलेली 'लेन' वाहतुकीसाठी दोन दिवसात सुरु करण्यात करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अखेर चौथ्या दिवशी म्हणजे आज, मंगळवारी दुपारपासून वागदेतील ही दुसरी लेन सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी प्रांताधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी ग्रामस्थांसहीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दुसरी लेन सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला त्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. दोन दिवसांत दुसरी लेन सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले होते.
मात्र, तीन दिवस उलटूनही लेन सुरू न झाल्याने ही लेन कधी सुरू होणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला तरीही 'लेन' दुरूस्तीचे काम सुरु राहिल्याने वाहनचालकांची गैरसोय होत होती. ही लेन सुरू होण्यासाठी माजी जि.प. अध्यक्ष गोट्या सावंत, वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर व इतरांनी आग्रही भूमिका घेतली होती.
अखेर मंगळवारी दुपारपासून ही लेन सुरू करण्यात आली आहे. यामुळे एकाच लेनवरून दोन्हीकडील वाहने जात असल्याने अपघाताची निर्माण होणारी शक्यता यामुळे कमी होणार आहे. याबाबत वाहन चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.