रेल्वे दुपदरीकरण जूनपासून : गीते
By admin | Published: May 28, 2015 12:04 AM2015-05-28T00:04:12+5:302015-05-28T00:58:12+5:30
महामार्ग चौपदरीकरण प्रारंभ आॅक्टोबरमध्ये
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आॅक्टोबर २०१५ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल. हे काम २०१७ पर्यंत पूर्ण केले जाईल. तसेच कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचा प्रारंभ जून २०१५ मध्ये रोहा व सावंतवाडी येथे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे दिली. केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावकर नाट्यगृहात बुधवारी आयोजित जनकल्याण पर्व मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून अनंत गीते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना-भाजपचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते. त्यावेळी गीते यांनी वर्षभरातील कोकणसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम ४२०० कोटी खर्चाच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पास मंजुरी दिली. या महामार्गावर आतापर्यंत हजारो प्रवाशांचा बळी गेला आहे. चौपदरीकरणाने प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. आधीच्या सरकारने केवळ बीओटी तत्त्वावर हे काम करण्याची घोषणा केली. मात्र, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर स्वनिधीतून हे चौपदरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले. चौपदरीकरणातील पनवेल ते इंदापूर हे ८४ किलोमीटरचे काम आधीच्या सरकारने बीओटी तत्त्वावर करावयास दिले होते. ते अपूर्ण होते. आता ते कामही शासनाने ताब्यात घेतले आहे. या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच कमीत कमी विस्थापन व शंभर टक्के पुनर्वसन यावर भर दिला जाणार आहे. आवश्यकता भासल्यास काही ठिकाणी पर्यायी मार्ग बनविण्याचीही तयारी आहे, असे ते म्हणाले.
कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला येत्या जूनमध्ये प्रारंभ होणार आहे. दुपदरीकरण झाल्यावर या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढेल व वेळही वाचेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
इंदापूर ते झाराप चौपदरीकरण कामाचे दहा टप्पे करण्यात आले आहेत. मोजणी, संपादन काम पूर्ण होताच येत्या आॅक्टोबरमध्ये सर्व टप्प्यांच्या निविदा एकाचवेळी काढल्या जाणार आहेत. एकाचवेळी सर्व टप्प्यांतील रस्ता चौपदरीकरणाची कामे सुरू केली जाणार आहेत.
लोटेत २४०० कोटींचा कागदनिर्मिती प्रकल्प
जिल्ह्यातील लोटे येथे २४०० कोेटींचा पेपर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी कोकणातील जमिनीतून बांबू उत्पादन घेतले जाणार आहे. तसेच घाटमाथ्यावर व जवळच्या ठिकाणी असलेल्या साखर कारखान्यांतील उसाचे चिपाड हा कच्चा माल म्हणून वापरला जाणार आहे, असे गीते म्हणाले.