नांदगाव रेल्वे स्टेशनवर तुतारी एक्स्प्रेसला थांबा मिळण्यासाठी रेल रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 01:06 PM2023-02-25T13:06:53+5:302023-02-25T13:19:55+5:30
कोरोना काळापासून तुतारी रेल्वेला थांबा बंद
कणकवली: कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील सर्वांना जवळ असलेले नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे तुतारी एक्स्प्रेसला थांबा मिळण्यासाठी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. नांदगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी मागील कोरोना काळापासून तुतारी रेल्वेला थांबा बंद केलेला आहे.
वारंवार संबंधित विभागांना व मंत्री यांना विनंती करूनही अद्याप पर्यंत रेल्वे थांब्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे येत्या काळात रेल रोको करण्यात येणार आहे.अशी माहिती वाघेरी माजी सरपंच संतोष राणे यांनी दिली.
तसेच त्या आंदोलनाच्या नियोजनासाठी उद्या, रविवारी (दि.२६) सकाळी १० वाजता नांदगाव रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी नियोजन बैठक आयोजित केली आहे. यावेळी गावातील व परिसरातील ग्रामस्थानी उपस्थित रहावे. यावेळी रेल रोको आंदोलनाची तारीख व वेळ निश्चित करून रेल्वे प्रशासनास जाग आणण्यासाठी तसेच एकजुटीने आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संतोष राणे व नांदगाव पंचक्रोशी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली आहे.