माणगाव खोऱ्यातील हत्तींना प्रशिक्षित करणार
By admin | Published: December 13, 2014 11:50 PM2014-12-13T23:50:04+5:302014-12-13T23:50:04+5:30
आंबेरीला भेट : सुनीलकुमार लिमये यांची माहिती
माणगाव : माणगाव खोऱ्यात असलेल्या तीन जंगली हत्तींना प्रशिक्षित करून त्यांना तेथेच ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती वन्यजीव विभागाचे अप्पर सचिव सुनीलकुमार लिमये यांनी दिली. लिमये यांनी आज, शनिवारी आंबेरी येथील हत्तींना ठेवण्यात येणाऱ्या भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपवनसंरक्षक रमेशकुमार, वनक्षेत्रपाल संजय कदम उपस्थित होते. लिमये म्हणाले, माणगाव खोऱ्यात तीन हत्ती आहेत, तर तिलारी परिसरातही हत्तींचा एक कळप आहे. त्यालाही मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासंदर्भातील प्रोजेक्ट माणगावातील हत्तींना प्रशिक्षित केल्यानंतर केला जाईल. मात्र, प्रथम माणगाव खोऱ्यातील हत्तींना एकसंध करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याची सुरुवातही करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी कर्नाटकातून काही प्रशिक्षित हत्ती आणण्यात आले आहेत. त्या हत्तींना आंबेरी परिसरात ठेवण्यात आले असून या हत्तींच्या माध्यमातूनच त्या तीन हत्तींना प्रशिक्षित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागणार असून त्याचे पूर्ण साहित्य आम्ही येथे ठेवले आहे. या हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार असल्याचेही लिमये यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)