तळेरेत गणित विषयाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:22 PM2017-09-27T16:22:32+5:302017-09-27T16:27:01+5:30
तळेरे : तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इयत्ता ९ वीच्या गणित विषयाचे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणाला कणकवली व वैभववाडी तालुक्यातील सुमारे ४५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
तळेरे 27 : तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इयत्ता ९ वीच्या गणित विषयाचे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणाला कणकवली व वैभववाडी तालुक्यातील सुमारे ४५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन तळेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. के. कोरे यांच्या हस्ते सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी या प्रशिक्षणाचे समन्वयक कोचरे, तज्ज्ञ मार्गदर्शक एस. बी. शिंदे, एस. जी. नलगे, विशेष तज्ज्ञ व प्रशिक्षण समन्वयक सुरेखा कोचरे, प्रशिक्षणार्थी तथा मुख्याध्यापक हनुमंत वाळके आदी उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्ता ९ वीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या सर्वविषयांची पाठ्यपुस्तके कृति पुस्तिका स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी या दोन्हीही माध्यमाच्या सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तक अध्यापनाच्या प्रशिक्षणांचे आयोजन विविध विद्यालयात करण्यात आले आहे. एकूण नऊ दिवस जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमधून हे प्रशिक्षण चालणार असून गणित विषयाचे प्रशिक्षण तळेरे विद्यालयात पार पडले.
या प्रशिक्षणाला अ. रा. माध्यमिक विद्यालयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक एस. बी. शिंदे यांनी मूल्यमापन योजना, नमुना कृतीपत्रिका यावर तर तळेरे माध्यमिक विद्यालयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक एस. जी. नलगे यांनी पाठ्यपुस्तक ओळख, बदललेला अभ्यासक्रम व कृतीयुक्तअध्यापन यावर या एक दिवशीय प्रशिक्षणात मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी तथा सिंधुदुर्ग जिल्हा गणित मंडळांचे अध्यक्ष औंदुबर भागवत यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. तसेच या प्रशिक्षणाला डाएटच्या रूपाली देसाई यांनी भेट दिली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक सी. के. कोरे यांनी, सूत्रसंचलन शिंदे तर आभार एस. जी. नलगे यांनी मानले.
नमुना कृतीपत्रिकांचे प्रात्यक्षिक
या प्रशिक्षणा दरम्यान उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांकडून नमुना कृतीपत्रिका तयार करून घेतल्या. याबाबत प्रशिक्षणार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले.